जळगाव : देशातील दिव्यांग प्रवाशांसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवास सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने नियम अधिक स्पष्ट केले आहेत. वैध युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड बाळगणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना आता मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमधील दिव्यांगांसाठी राखीव नसलेल्या डब्यांमधूनही प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे प्रवासातील अडचणी कमी होऊन दिव्यांगांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

रेल्वेच्या निवेदनानुसार, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाद्वारे जारी करण्यात आलेले युनिक डिसॅबिलिटी आयडीकार्ड (यूडीआयडी) हे दिव्यांगत्वाचे प्रमाणित व देशभर मान्यताप्राप्त ओळखपत्र आहे. या कार्डधारक व्यक्तींना तसेच भारतीय रेल्वेकडून भाड्यात सवलत मिळण्यासाठी पात्र असलेल्या प्रवाशांना जर त्यांच्याकडे वैध तिकीट किंवा प्रवासासाठी आवश्यक अधिकृत कागदपत्रे असतील तर एसएलआरडी (सेकंड क्लास लगेज-कम-ब्रेक व्हॅन विथ दिव्यांग कंपार्टमेंट) आणि एलएसएलआरडी डब्यांमध्ये अधिकृत प्रवासी म्हणून प्रवास करता येणार आहे. पूर्वी अनेकदा असे दिसून येत होते, की दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे किंवा गर्दीमुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत होती. काही प्रकरणांमध्ये तर दिव्यांग प्रवाशांना सामान्य डब्यांमध्ये प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रेल्वेने नियम स्पष्ट करून दिव्यांग प्रवाशांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.

दिव्यांगाच्या डब्यात प्रवास केल्यास…

तसेच, रेल्वे प्रशासनाने कडक इशारा दिला आहे, की दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाईल. रेल्वे अधिनियम १९८९ अंतर्गत अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, यामुळे या सुविधा केवळ पात्र आणि गरजू लाभार्थ्यांनाच मिळतील याची खात्री दिली जात आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व विभागीय रेल्वे मंडळांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी अधिक कडक करण्याचे, तसेच दिव्यांग प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे दिव्यांग प्रवाशांच्या प्रवासात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, हा निर्णय दिव्यांगांच्या हक्कांना बळकटी देणारा आणि सार्वजनिक वाहतूक अधिक समावेशक बनवणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

कार्डासाठी कुठे अर्ज करावा?

दिव्यांगजन कार्ड किंवा ई-तिकिटिंग फोटो ओळखपत्र (EPICS) याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. हे कार्ड रेल्वे प्रवासात सवलत मिळवण्यासाठी अत्यावश्यक मानले जाते. वैध दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे हे कार्ड जारी केले जाते. आणि अनेक प्रकरणांमध्ये यूडीआयडी कार्ड देखील त्यास पर्याय म्हणून ग्राह्य धरले जाते. हे कार्ड मिळवण्यासाठी किंवा त्याचे नूतनीकरण करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना भारतीय रेल्वे दिव्यांगजन पोर्टल तसेच केंद्र सरकारच्या सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येतो. या प्रक्रियेमुळे अर्ज करणे अधिक सोपे व पारदर्शक झाले आहे.