जळगाव : भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर काढण्यात आलेली पिवळी रेषा ही त्याच सुरक्षा व्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. अनेकदा प्रवाशांच्या नजरेस ही पिवळी रेषा पडते, मात्र तिचे नेमके महत्त्व आणि तिच्यामागील सुरक्षेचा उद्देश अनेकांना माहिती नसतो.
फलाटाच्या कडेला काढलेली पिवळी रेषा ही सुरक्षित अंतराची मर्यादा दर्शवते. रेल्वेगाडी स्थानकात प्रवेश करताना किंवा स्थानकातून वेगाने जात असताना मोठ्या प्रमाणात हवेचा दाब निर्माण होतो. या दाबामुळे फलाटाच्या अगदी कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊ शकतो. विशेषतः सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्या वेगाने फलाटाजवळून धावत असताताना त्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. अशावेळी निष्काळजीपणे पुढे उभे राहिल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहण्याचा नियम प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
रेल्वे स्थानकांवर अनेकदा गर्दीच्या वेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. गाडी येण्यापूर्वीच प्रवासी फलाटांवर गर्दी करतात. काही जण गाडी येण्यापूर्वीच फलाटाच्या टोकावर उभे राहतात, तर काही जण भ्रमणध्वनीमध्ये व्यस्त असल्याने आसपासच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात. या निष्काळजीपणामुळे अनेकदा अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काही वेळा प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्नही करतात. अशा प्रसंगी छोटासा धक्का किंवा पाय घसरल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासन सातत्याने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत असते.
पिवळ्या रेषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा विशेष उठावदार किंवा खडबडीत पृष्ठभाग. दृष्टीदोष असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरते. स्पर्शातून त्यांना फलाटाची सुरक्षित मर्यादा ओळखता येते. अनेक आधुनिक रेल्वे स्थानकांवर या रेषा अधिक स्पष्ट आणि स्पर्शाने जाणवतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेलाही मोठा हातभार लागतो. रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर सातत्याने ध्वनिक्षेपकाद्वारे पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा, धावत्या गाडीत चढू नका, फलाटाच्या कडेला उभे राहू नका, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र अनेकदा प्रवासी त्या सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती मोहीम राबविली जाते.
विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा गर्दीच्या हंगामात स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी सुरक्षेचे नियम पाळणे अधिक गरजेचे ठरते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, बहुतांश अपघात हे निष्काळजीपणामुळे होतात. थोडी सतर्कता आणि नियमांचे पालन केल्यास अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात. रेल्वे स्थानकावरील पिवळी रेषा ही केवळ रंगीत खूण नसून प्रवाशांच्या जीवित सुरक्षेची महत्त्वपूर्ण सीमा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
