मनमाड : विनाकारण धावत्या रेल्वे गाडीतील धोक्याची साखळी ओढणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने कडक कारवाई सुरू केली आहे. जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत ५० हून अधिक रेल्वे प्रवाशांवर रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ४५ हजार रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला.
विनाकारण धावत्या गाडीची साखळी ओढणे हा गुन्हा असून प्रवाशांनी असे कृत्य करू नये, असे आवाहन मनमाड रेल्वे सुरक्षा दलाने केले आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये साखळी ओढण्याच्या घटनेत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा दलाने मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक संदीप देसवाल यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती मोहीम हाती घेतली.
रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना याबाबत माहिती दिली जात आहे. या शिवाय परिसरात सर्वत्र व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारचे योग्य कारण असल्याशिवाय रेल्वे गाडीची साखळी ओढू नये, याची दक्षता सर्व प्रवाशांनी घ्यावी. रेल्वे प्रवासाला जाण्याआधी वेळेच्या अगोदर रेल्वे स्थानकात यावे, महिला व लहान मुलांना धावत्या गाडीत बसविण्याचा, उतरविण्याचा प्रयत्न करू नये किंवा धावपळीत खाली उतरून खाद्यपदार्थ घेऊन पुन्हा गाडीत चढण्याची घाई करू नये, याशिवाय रेल्वे डब्याच्या दरवाजाजवळ कोणतेही सामान ठेवू नये, याविरोधात कोणी कृत्य केल्यास त्याच्यावर भारतीय रेल्वे कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे सुरक्षा दल प्रशासनाने दिला आहे.