नाशिक : सुमारे ५०० कामगार, आठ क्रेन, पोकलॅन यंत्र, दुरुस्तीसाठीची विविध सामग्री आदींच्या साहाय्याने देवळाली-लहवीत दरम्यान ३०० मीटरच्या नव्या रेल्वे मार्गाची उभारणी करीत रेल्वे प्रशासनाने मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक अपघातानंतर अवघ्या २४ तासांत पूर्ववत केली. रविवारी दुपारी तीन वाजता एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले होते. अपघातात रेल्वे मार्ग पूर्णत: उखडला गेला होता. युध्दपातळीवर त्याची दुरुस्ती करीत सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात यश मिळाले.
मुंबईहून निघालेली पवन एक्स्प्रेस रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास डबे घसरल्याने अपघातग्रस्त झाली होती. अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अतिशय व्यस्त मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा विविध स्थानकांवर खोळंबल्या. लांब पल्ल्याच्या काही गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले तर काही रद्द करण्यात आल्या. मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी भुसावळ, मनमाड, इगतपुरी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायंकाळपासून झोकून दिले होते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी या कामावर लक्ष ठेवले.
या कामात रेल्वेचे आपत्कालीन साहाय्यता पथक, अपघातग्रस्त यातायात गाडी, आठ क्रेन, पोकलॅन यंत्रणा आणि ५०० कामगार सहभागी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. रुळावरून घसरलेले डबे पोकलॅन यंत्राद्वारे बाजूला करण्यात आले होते. यातील दोन डबे नाशिकरोडला पाठविण्यात आले. उखडलेल्या रेल्वे मार्गाच्या जागी ३०० मीटरचा नवीन रेल्वे मार्ग करण्यात आला. ओव्हरहेड वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. रेल्वे मार्गाचे काटेकोरपणे मोजमाप होऊन दुपारी तीन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर गोदान एक्स्प्रेस या मार्गावरून मार्गस्थ करण्यात आली. हा मार्ग वाहतुकीस सुरक्षित असल्याचा दाखला देखभाल विभागाने दिला. मुंबईकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा या मार्गावरून सोडण्यास सुरुवात होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक
अपघाताने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सोमवारी पुष्पक एक्स्प्रेस वगळता लांब पल्ल्याच्या अन्य रेल्वे गाडय़ा इतर मार्गावरून वळविल्या गेल्या नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातात काही अंतरावर असणारा नाशिक-मुंबई रेल्वे मार्ग बाधित झाला नव्हता. याच मार्गावरून मुंबईहून येणाऱ्या गाडय़ा टप्प्याटप्प्याने मार्गस्थ केल्या जात होत्या. दुरुस्ती झाल्यानंतर मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागला.