नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहराच्या प्रवेशद्वारावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरून नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेऊन हे काम बंद पाडले. रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. उड्डाणपूल भगूरकडे उतरेल,अशा पद्धतीने बदल न झाल्यास रेल्वेला भगूर नगरपालिका हद्दीत कुठलीही तोडफोड वा लोखंडी जाळ्या लावून रस्ते बंद करू दिले जाणार नाहीत, अशी भूमिका नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी मांडली.

उड्डाण पुलाचे काम बंद पाडल्याने मध्य रेल्वे आणि भगूर नगरपालिका यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेने विविध कामे हाती घेतली आहेत. भगूर येथे उभारण्यात येणारा उड्डाणपूल हा देखील त्याचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. परंतु, या रेल्वे उड्डाण पुलाचे संरेखन चुकीचे असून त्यातून भगूर शहराच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. तसेच हा पूल ग्रामीण रुग्णालयासाठी आरक्षित जागेच्या मार्गावर येतो. त्यामुळे भगूर शहराकडे जाणाऱ्या विद्यमान पुलाच्या रचनेशी वेगळे पूल संरेखन करावे. उड्डाण पुलात थोडा बदल करून भगूर शहराकडे थेट प्रवेश दिल्यास प्रवासाचा वेळ कमी होईल.

वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागेल याकडे भगूर नगरपालिकेने लक्ष वेधले होते. याबाबत मध्य रेल्वेशी वारंवार पत्रव्यवहार करूनही उत्तर आले नाही. उलट उड्डाण पुलाचे काम खोदकामासाठी रस्ते बंद करून गती दिली गेली. हे लक्षात आल्यानंतर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी धाव घेतली. उड्डाण पुलाचे काम थांबवून जेसीबी व अन्य सामग्री त्वरित काढून घेण्याची सूचना केली. यंत्रसामग्री न हटविल्यास नगरपालिकेमार्फत ती जमा केली जाईल, असे सूचित केले.

भगूर ही सावरकरांची जन्मभूमी असून तिचे ऐतिहासिक महत्व आहे. प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल लहवितच्या बाजूने उतरवला गेला. त्याऐवजी तो भगूरकडे उतरविणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वेने असाच घोळ घातला होता. मागे भगूरचा दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी उड्डाणपूल करून रेल्वेने भुयारी मार्ग न करताच काढता पाय घेतला होता.

पुढील आठ ते दहा वर्षांत सामाजिक संस्था व इकडून तिकडून निधी गोळा करून नगरपालिकेला रस्त्याचे काम करावे लागले. पुन्हा तसे घडू नये म्हणून रेल्वेचे अधिकारी पाहणी करून चर्चा करीत नाही, तोपर्यंत भगूर हद्दीत कुठेही खोदकाम वा रस्ते बंद करू दिले जाणार नाही, असे बलकवडे यांनी ठणकावले. नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत दिलेला ना हरकत दाखला ठरावाद्वारे रद्द करण्यात आला.

रेल्वे प्रशासनाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मगावाचे महत्व नाही, असा आक्षेप घेत नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी भगूरचे महत्व कमी होणार नाही, अशा प्रकारे उड्डाण पुलात भगूरसाठी आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी केली. रेल्वे उड्डाण पुलाचे काम बंद केल्यामुळे भगूर नगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.