जळगाव : मध्य रेल्वेने जळगाव-जालना नवीन मार्ग टाकण्यासाठी अनुषंगिक कामांच्या हालचाली वाढवल्या आहेत. जळगाव-भुसावळ दरम्यानच्या पाचव्या मार्गाचे काम करतानाच जळगाव रेल्वे यार्डात सहाव्या मार्गाचे काम त्यामुळे हाती घेतले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून शिवाजीनगर पुलापासून जमिनीचे सपाटीकरण देखील करण्यात आले आहे.

जळगाव-जालना या एकूण १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी तब्बल १४० किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातून तर उर्वरित ३४ किलोमीटरचा भाग जळगाव जिल्ह्यातून असणार आहे. या मार्गासाठी आवश्यक जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव-भुसावळ रेल्वेमार्गावरील भादली स्थानकापासून नवीन जालना मार्ग वळविण्यात येणार असल्याने त्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्राथमिक कामाला सुरूवात केली आहे. जळगाव-भुसावळ दरम्यान पाचव्या रेल्वेमार्गाचे काम सुरू असतानाच, प्रस्तावित जालना मार्गासाठी जळगाव-भादलीदरम्यान अंदाजे नऊ किलोमीटर लांबीचा सहावा मार्ग उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक जमिनीचे सपाटीकरण सुरू करण्यात आले आहे.

भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष मार्ग निर्मितीचे काम तत्काळ हाती घेतले जाईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. नवीन रेल्वे मार्गामुळे जालना-जळगाव दरम्यानचा संपर्क अधिक सुलभ होणार असून, मराठवाडा आणि खान्देश भागातील प्रवासी आणि मालवाहतूक अधिक जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मार्गामुळे जळगावमार्गे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवासी तसेच मालगाड्यांना आंध्र प्रदेश तसेच दक्षिण भारताशी अधिक वेगवान दळणवळण साधता येणार आहे.

विशेषतः जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही या मार्गाचा मोठा लाभ मिळणार आहे. जळगाव-अजिंठा-जालना या पर्यटन पट्ट्यातील प्रवास सुखकर होऊन पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन रेल्वे मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रालाही चालना मिळेल.

जळगाव-भुसावळ स्थानकांदरम्यान यापूर्वी चार रेल्वे मार्गांचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यावरून प्रवासी व मालवाहतूक गाड्या दररोज धावत आहेत. त्यानंतर आता जळगाव-भादली स्थानकांदरम्यान नऊ किलोमीटर लांबीच्या पाचव्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. पाचव्या रेल्वे मार्गाचे काम करताना लेंडी नाल्यापासून जळगाव स्थानकापर्यंतच्या यार्डात सहावा मार्ग सुद्धा टाकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कंत्राटदाराने शिवाजीनगर पुलापासून लेंडी नालापर्यंतच्या भागाचे डाऊन दिशेला तहसील कार्यालयाच्या बाजुने जमीन सपाटीकरण पूर्ण केले आहे. लवकरच या ठिकाणी पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग एकाच वेळी टाकण्यात येणार आहे. दोन्ही मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव स्थानकावर प्रस्तावित असलेल्या नवीन फलाटावर अप दिशेला जाणाऱ्या गाड्या थांबवणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.