अमरावती : शेगावसह भुसावळ, नाशिकपर्यंत जाण्यासाठी उपयोगी ठरत असलेल्या अनारक्षित बडनेरा-नाशिक रोड मेमूचा कालावधी आणखी तीन महिने वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या मेमू गाडीच्या  ३१ मार्च पर्यंत एकूण १८० (जाणे-येणे) फेऱ्या होणार आहेत. मेमू क्र. ०९२११ बडनेरा-नाशिक रोडची मुदत ३१ डिसेंबरपर्यंतच होती. परंतु, तिला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही मेमू येत्या ३१ मार्चपर्यंत बडनेरा ते नाशिक ९० फेऱ्या करेल. त्याचप्रमाणे नाशिक रोड ते बडनेरापर्यंत ९० फेऱ्या करेल.

यंदा फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्यामुळे या महिन्यात अप-डाऊन ५६ फेऱ्या होतील. ही मेमू बडनेरा येथून ही सकाळी १०.०५ वाजता निघते. त्यामुळे अमरावती व बडनेरा येथील प्रवाशांना शेगाव येथे जाण्यासाठी ती सोयीची आहे. कारण, दीड ते दोन तासात ती शेगाव येथे पोहोचते. या मेमूमध्ये शेगावला जाणाऱ्या भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. सोबतच मूर्तिजापूर, अकोला, नांदुरा, मलकापूर या ठिकाणीही जाण्यास ही मेमू उपयोगाची आहे. त्याचप्रमाणे नाशिक रोड-बडनेरा मेमू क्र. ०१२१२ ही ३१ मार्चपर्यंत धावणार असून, ९० फेऱ्या करणार आहे.

नाशिक रोड येथून रात्री ९.१५ वाजता ती निघते, तसेच बडनेरा स्थानकावर पहाटे ४.३५ वाजता पोहोचते. त्यामुळे नाशिक रोड येथून प्रवाशांना आरामात रात्री झोप घेत बडनेरा, अमरावतीपर्यंत पोहोचता येते. केवळ स्लीपर बर्थ नसल्यामुळे मिळालेल्या आसनावरच झोप घ्यावी लागते. त्यामुळे शेगावसह त्र्यंबकेश्वर येथे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोयीस्कर मेमू आहे. एवढेच नव्हे तर सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कमी असल्यामुळे या मेमूत प्रवाशांची चांगलीच गर्दी असते.

या मेमूला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे तिचा कालावधी सातत्याने प्रत्येक तीन महिन्यांनी वाढवला जात आहे. आता पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ या मेमू गाडीला मिळाली आहे. प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. ही मेमू मार्गातील प्रत्येक स्थानकावर थांबा घेते. तसेच आरक्षण करण्याचीही कटकट नाही. सोबतच दैनंदिन तिकीटही वाजवी आहे. ज्यांनी दररोज जाणे-येणे करावे लागते, त्यांनी मासिक पास काढली की, दररोज तिकीट काढण्याचीही आवश्यकता नाही. त्यामुळे ही मेमू चाकरमाने, विद्यार्थी, बाजारहाट करणारे व्यापारी आणि महत्त्वाचे म्हणजे भाविकांच्या दृष्टीने फारच उपयोगी सोयीस्कर आहे. या मेमुद्वारे शेगाव व त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला जाण्याची सोय झाली आहे.