नाशिक – दक्षिण भारत म्हणजे पर्यटनासाठी अतिशय योग्य असा भाग. दक्षिण भारतात धार्मिकता आवडणाऱ्यांसाठी तसेच निसर्ग आवडणाऱ्यांसाठी सर्वकाही आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने दक्षिण भारतात अनेक ठिकाणे आहेत. एरवी, दक्षिण भारतातील या धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी अधिक खर्च येऊ शकतो. परंतु, इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम काॅर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित धार्मिक पर्यटन यात्रेतंर्गत अतिशय कमी किंमतीत दक्षिण भारतातील नऊ ठिकाणांना भेट देण्याची पर्यटकांना संधी मिळणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम काॅर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) भारतीय रेल्वेशी संलग्न आहे. हा विभाग भारतीय रेल्वेसाठी तिकीट नोंदणी, खानपान आणि पर्यटन अशा सेवा देतो. आयआरसीटीसीच्या वतीने भारतात तसेच भारताबाहेरही विविध ठिकाणी पर्यटन यात्रा काढल्या जातात. वाजवी दरातील या पर्यटन सहली लोकप्रियही झाल्या आहेत. पर्यटन सहलीदरम्यान राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था राहत असल्याने पर्यटकांकडून आयआरसीटीसीच्या सहलींना प्राधान्य दिले जात आहे.
दक्षिण भारतातील मुरुडेश्वर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम आणि महाबलीपुरम ही प्रसिध्द धार्मिक ठिकाणे आहेत. या प्रत्येक ठिकाणाचे आपले एक वैशिष्टे आहे. कन्याकुमारी म्हणजे भारताचे शेवटचे टोक म्हणता येईल. कन्याकुमारी येथे विवेकानंद स्मारकासह अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. नितळ समुद्राचा आनंदही या ठिकाणी घेता येऊ शकतो. याशिवाय दक्षिण भारतातून रेल्वेव्दारे प्रवासाचा एक वेगळाच आनंद असतो. हिरवेगार झाडींमधून रेल्वे जात असताना दुतर्फा दाट निसर्ग तुम्हालां वेगळीच साद देत असतो. त्यामुळे मन उल्हासित होते. रामेश्वरम, कांचीपुरम, महाबलीपुरम ही ठिकाणे तर आपल्या खास धार्मिकतेसाठी प्रसिध्द आहेत. या ठिकाणी कायमच भाविक भेट देत असतात. अशा ठिकाणांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद असतो. रेल्वेव्दारे होणारी ही पर्यटन सहल म्हणजे एक आनंदाचा ठेवा असतो. इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम काॅर्पोरेशन लिमिटेडने या सर्व ठिकाणांच्या दर्शनासाठी विशेष पर्यटन सहलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आनंददायक बातमी म्हणजे, या सहलीची सुरुवात मनमाड रेल्वे स्थानकपासून होणार आहे. मनमाड, नाशिकरोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज या रेल्वे स्थानकांपैकी कोणत्याही स्थानकातून पर्यटक या रेल्वेसेवेचा लाभ घेऊ शकतात.
“टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण” नावाची ही पर्यटन सहल पर्यटक भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेनव्दारे करणार आहेत. या सहलीचा कालावधी १२ रात्री आणि १३ दिवस असा आहे. मनमाड रेल्वे स्थानकापासून १८ फेब्रुवारीपासून या टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण पर्यटन सहलीला सुरुवात होणार आहे. या पर्यटन सहलीत निवास, जेवण, विमा, जीएसटी, सर्व ठिकाणांपर्यंत थेट व्यवस्था अशा सर्व सुविधा समाविष्ट आहेत. दर्शनासाठी वाहतुकीची व्यवस्था केलेली असते. या संपूर्ण सहलीचे मूल्य प्रतिव्यक्ती २३, ३७० रुपये आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी केली जाते. त्यामुळे पर्यटकांनी त्वरीत नोंदणी करणे आवश्यक असते.

