कार्यक्रमांत कोणतेही बदल नसल्याचे आयोजकांकडून स्पष्ट

वेगवेगळ कारणांनी गाजत असलेल्या येथील मराठी साहित्य संमेलनावर अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकल्यानंतर आयोजकांनी खुल्या जागेत हिरवळीवर होणारे कार्यक्रम छत असणाऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निश्चित केले आहे. संमेलनाचा मुख्य मंडप जल आणिअग्निरोधक असल्याने तिथे पावसाने व्यत्यय येणार नाही. छतावरून पडणारे पावसाचे पाणी मंडपात येऊ नये, याकरिता चर खोदून ते बाहेर काढण्याची व्यवस्था केली जात आहे. अकस्मात आलेल्या पावसामुळे संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना बुधवारी दिवसभर सुरू राहिलेल्या पावसाने आयोजकांची एकच धावपळ उडाली. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनस्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. सुमारे सात हजार क्षमतेचा संमेलनाचा मुख्य मंडप जलरोधक आहे. तिथे गळती झाली नाही. पण, त्याच्या छतावरून पडणारे पाणी दोन ठिकाणी आत शिरले. संमेलनालगत एक उपमंडप आहे. तिथे मोठी गळती झाली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचनालयाचा तो कक्ष आहे. पावसाचा अंदाज नसल्याने या कक्षाची तशी उभारणी झाली. परंतु, गळती रोखण्यासाठी उपाय केले जातील. नव्याने जे काही प्रश्न तयार झाले, त्यांची सोडवणूक केली जाईल, असे मंडप दालन उभारणी समितीचे प्रमुख रंजन ठाकरे यांनी सांगितले.

संमेलन स्थळी चार सभागृह आहेत. अनेक कार्यक्रमांसाठी त्यांचा उपयोग करण्यात येणार आहे. पावसाचा फटका मोकळय़ा जागेत हिरवळीवर होणाऱ्या कार्यक्रमांना बसला आहे. कविकट्टा, गझल मंच आणि बालकुमार मेळाव्यासाठी खुल्या भागातील हिरवळ असणारी ठिकाणे आधी निश्चित झाली होती. आता गझल मंच बंदीस्त सभागृहात, कविकट्टा उपहारगृहालगतच्या छत असणाऱ्या मोकळय़ा जागेत तर बालकुमार मेळावा संमेलन स्थळात प्रवेश करतानाच्या जागेत होणार आहे. 

वाहतुकीसाठी ३०० गाडय़ांचा ताफा..पावसाचा जोर

वाढल्यास संमेलनातील उपस्थितीवर परिणाम होऊ शकतो. संमेलन काळात साहित्यप्रेमीची उपस्थिती वाढविण्यासाठी ३०० गाडय़ांचा ताफा सज्ज ठेवला गेला आहे. शहरातील सर्व भागातून संमेलन स्थळी ये-जा करण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा आहे. त्यामुळे पाऊस कायम राहिल्यास शहर ते संमेलन स्थळ भिजत प्रवास करावा लागणार नाही. हे साहित्य संमेलन नाशिककरांचे असून मोठय़ा संख्येने संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

x