Raj Thackeray Nashik Speech : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी सुरू आहेत. सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या अनुषंगाने आज नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दत्तक घेतो बोलले, पण हा बाप परत फिरकलाच नाही’, असं म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.

राज ठाकरे काय म्हणाले?

“नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी यांना (सत्ताधाऱ्यांना) झाडे देखील छाटायची आहेत. मात्र, झाडे छाटायच्या अगोदर स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते छाटले. स्वत:च्या पक्षातील लोक आधी छाटले. मग बाहेरून झाडे मागवली आणि मग ती पक्षात लावत आहेत. ही कोणती परिस्थिती? महाराष्ट्रात हे कोणतं राजकारण चालू आहे? २०१२ मध्ये जेव्हा नाशिकच्या महापालिकेत माझी सत्ता होती आणि त्यानंतर २०१७ साली देवेंद्र फडणवीस आले आणि म्हणाले की मी नाशिकला दत्तक घेतो. त्यांच्या या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामे करून ठेवली होती ते सगळे विसरले. देवेंद्र फडणवीस नाशिकला दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय-काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

‘महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ’

“आज अनेक वर्ष रखडलेल्या निवडणुकांची कारणे कोणालाही देता येणार नाहीत किंवा सांगता येणार नाहीत, कारण कोणाला ती कारणे कळलीच नाहीत. या निवडणुका घेण्यासाठी एवढी वर्ष का लागली? चार वर्षांपासून मुदत संपून देखील या निवडणुका होत नव्हत्या, याचं उत्तर आताच्या सरकारने दिलं पाहिजे. मग एवढ्या वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, तर महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. कोण कुठे चाललंय? काही कळत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी मागे एकदा म्हटलं होतं की एवढा चुकीचा कॅरम फुटला आहे की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भो### आहेत तेच कळत नाहीत. प्रत्येकाला विचारावं लागतं की आज कुठे? काही जण तर वेडेपिसे झालेत, त्या दिवशी मला कळलं की एकाने समोरच्याचा एबीफॉर्मच घेतला आणि गिळून टाकला. कोणत्या थराला गेल्यात निवडणुका? महाराष्ट्रात ६० ते ७० व्यक्ती सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून कसे येतात?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

‘एका घरातील तिघांना १५ कोटींची ऑफर’

“तुम्ही तिकडच्या मतदारांना मतदानाचा अधिकार देणार नाही का? काही वेळा दहशतीमधून आणि अनेकदा तर पैशातून निवडणूक बिनविरोध केली जाते? या निवडणुकीत मी काय आकडे ऐकतोय? कोणाला एक कोटी, कोणाला दोन कोटी, कोणाला पाच कोटी. आमच्या कल्याण-डोबिंवलीतील एका प्रभागात, तिथे एकाच कुटुंबातील तीघेजण निवडणुकीला उभे आहेत. काय ऑफर झाली असेल? तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत. एका प्रभागातील तीन जणांना, जे तिन्ही जण एका घरातील आहेत त्यांना १५ कोटींची ऑफर झाली. १५ कोटी? येतात कुठून हे पैसे? तुम्ही महाराष्ट्राची ही परिस्थिती करून ठेवली”, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला.