नाशिक – खड्डेमय नाशिकमध्ये दाखल झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिला दिवस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन आणि महाविद्यालयीन युवकांशी चर्चेत घालवला. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली. पक्षीय बैठक असो की जेन झींशी भेट. नाशिकमधील खोदकाम, खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. राज ठाकरे हे दिवसभरात अनेकांना भेटले. परंतु, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैद्यनाथ काळे यांना तासभर प्रतिक्षा करूनही भेटता न आल्याने माघारी परतावे लागले.

पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चाललेल्या कामांमुळे नाशिक खड्डेमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. स्वागतासाठी मुंबई नाका चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या गर्दीमुळे  वाहतूक कोंडीत अधिक भर प़डली. दुपारी साडेबारा वाजता राज यांचे आगमन झाले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात शाखा प्रमुख, बीएलए (मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी), ग्रामीण व शहरातील पदाधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा केली. एसआयआर मोहिमेत मतदानकेंद्रनिहाय काम करायला पाहिजे. २५० मतदारांसाठी एक बीएलए असे प्रमाण राखल्यास काम करणे सोपे होईल, असे राज यांनी सूचित केले.

मनसेच्या काळातील कामे जनतेसमोर मांडा

शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यांना राज यांनी आपल्या भागातील नागरी समस्या व प्रश्न सक्षमपणे मांडण्याची सूचना केली. २०१२ ते २०१७ या कालावधीत महापालिकेत मनसेची सत्ता होती. त्या काळात नाशिकसाठी चांगले प्रकल्प उभारले गेले. चांगले रस्ते आणि वाहतूक बेटे होती. सद्यस्थितीत या गोष्टी नाशिककरांसमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

जेन झींशी चर्चा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. नीट पेपर फूट, खड्डेमय रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या असे प्रश्न मांडल्याचे बारावीत शिक्षण घेणाऱ्या गार्गी जोशी हिने सांगितले. सर्वत्र खोदकाम आणि खड्डेमय रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातात पाच वाहनधारकांचा मृत्यू झाला, कित्येक जण जखमी होत आहेत. ज्या ठिकाणी जाण्यासाठी १५ ते २० मिनिट लागायचे, तिथे पोहोचण्यास पाऊण ते एक तास लागतो, याकडे लक्ष वेधण्यात आले. हे प्रश्न योग्य प्रकारे सोडविले जातील, अ्से आश्वासन राज यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

सुवर्णपदकप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक ताटकळले

राष्ट्रकूल पॅरा क्रीडा स्पर्धेत धावण्यात सुवर्णपदक मिळविणारा दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैद्यनाथ काळे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आले होते.  तासभर प्रतिक्षा करूनही भेट न झाल्याने त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मैदानावर जाण्याचे कारण देत गावित आणि काळे  दोघेही निघून गेले. सुवर्णपदक विजेते दिलीप गावित भेटीला आल्याची माहिती राज ठाकरे  यांच्यापर्यंत पोहोचली की नाही, याबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्टता केली नाही.