नाशिक – कुंभमेळा कामांसाठी झालेले खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात आतापर्यंत पाच जणांना प्राण गमवावे लागले. अपघाताांमध्ये अनेक जण जायबंदी होत आहेत. नाशिकमध्ये खोदकाम आणि खड्ड्यांमुळे जनक्षोभ उसळला असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरूवारपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाशी युती करून मनसेने महापालिका निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. सर्व जागांवर मनसे पराभूत झाली. निवडणुकीतील पराभवाची कारणमिंमासा, कुंभमेळा कामांमुळे नाशिकमध्ये निर्माण झालेली स्थिती याचा आढावा राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी मुंबई नाका येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात शाखा अध्यक्षांची बैठक घेतील. या बैठकीनंतर नाशिक ग्रामीण म्हणजे १५ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होईल. महापालिका निवडणुकीतील उमेदवार आणि बीएलए अर्थात मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांच्यासमवेत राज हे चर्चा करणार आहेत. दुपारी शहर कार्यकारिणी आणि इतर अंगीकृत संघटना यांच्याबरोबर बैठक होईल. शुक्रवारी मनसेमध्ये इतर पक्षांमधील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
कुंभ कामांची तुलनात्मक पडताळणी ?
२०१५ मधील कुंभमेळ्यात नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती. त्यावेळी अनेक कामे होऊनही यंदासारखी बिकट परिस्थिती उद्भवली नव्हती. यावेळी धोकादायक स्थिती असून खोदकामांनी शहरातील एकंदर स्थितीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अवलोकन केले जाण्याची शक्यता आहे. साधुग्राम उभारणीसाठी सुमारे दोन हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवल्यानंतर मनसेने त्यास विरोध केला. मागील कुंभमेळ्यात तपोवनातील एकही झाड तोडावे लागले नव्हते. यावेळी इतकी झाडे तोडण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न मनसेकडून उपस्थित होत आहे. राज ठाकरे हे मनसेच्या महापालिकेतील सत्ताकाळात कुंभमेळ्यातील कामे आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या सत्ता काळातील कुंभच्या कामांची तुलनात्नक मांडणी करण्याची शक्यता पक्षाच्या गोटातून वर्तविली जात आहे.
