नाशिक – इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा हंगाम आता शेवटाकडे सरकू लागला आहे. प्ले ऑफमधील अंतिम चार संघ कोणते असतील, हे अजूनही निश्चित झालेले नाही. हा आयपीएलचा हंगाम नाशिककरांसाठी विशेष ठरला आहे. कारण, या हंगामात नाशिकच्या दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. याशिवाय, अजून एक खास गोष्ट घडली. राजस्थान रॉयल्स संघाशी नाशिकचे खास कनेक्शन जुळले. ९ मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यातील खास गुलाबी जर्सी आणि नाशिक यांचे वेगळेच नाते पुढे आले.
आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये केवळ मैदानावरच नव्हे तर, मैदानाबाहेरही अनेक घडामोडी घडत असतात. त्यापैकी बऱ्याच घटनांपासून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीही अनभिज्ञ असतो. आयपीएल २०२६ चा हंगाम नाशिककरांसाठी असेच काही वेगळेपण घेऊन आला. मागील हंगामाप्रमाणे यावेळीही चेन्नई सुपर किंग्जने नाशिकच्या रामकृष्ण घोषला आपल्या संघात कायम ठेवले. विशेष म्हणजे त्याला एका सामन्यात खेळवलेही. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सनेही नाशिकचा सलामीवीर साहिल पारखला दोन सामन्यांमध्ये संधी दिली. जिओ हॉटस्टारवर आयपीएल सामन्याचे मराठीतून समालोचन करण्याची संधी नाशिकच्या सोहम शहाणेला मिळाली. याशिवाय नाशिकच्या बाबतीत अजून एक घडामोड घडली.
राजस्थान रॉयल्सने ‘HunaRR Manch contest’ ही स्पर्धा ठेवली होती. या स्पर्धेत ८५०० हून अधिक प्रवेशिकांमधून नाशिकच्या १९ वर्षीय समीक्षा रामेश्वर मुंदडाने डिझाइन केलेली जर्सी निवडली गेली. संपूर्ण राजस्थान रॉयल्स संघ या खास गुलाबी जर्सीमध्ये ९ मे रोजी झालेल्या गुजरात टायटन्सविरुध्दच्या सामन्यासाठी मैदानात उतरला होता. हा सामना रॉयल्सच्या तिसऱ्या वर्षाच्या ‘Pink Promise Match’चे प्रतीक होता. राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या माध्यमातून राजस्थानमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमात सामाजिक बांधिलकी देखील सामील आहे. सामन्यादरम्यान मारल्या गेलेल्या प्रत्येक षटकारामागे, राजस्थानमधील सांबर या ऐतिहासिक शहरातील सहा घरांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून विद्युतीकरण केले जाईल. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची विद्यार्थी असलेल्या समीक्षाला लहानपणापासून डिझाइन करण्यात रस आहे. क्रिकेट खेळणाऱ्या, नेहमी पोस्टर्स तयार करणाऱ्या समीक्षाच्या पहिल्याच जर्सी डिझाइनला हे जोरदार यश मिळाले.
नामांकित क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रवीद्र जडेजाआणि रियान पराग यांच्या राजस्थान रॉयल्स संघाशी या पद्धतीने जोडले गेल्याबद्दल समीक्षा खूप आनंदित आहे. तिच्या इच्छेनुसार तिला ही गुलाबी – पिंक प्रॉमिस – जर्सी रवींद्र जडेजाला देण्याचे भाग्य मिळाले. ही तिच्यासाठी अतिशय अविश्वसनीय अशी घटना होती.
