जळगाव : जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात २ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, जोरदार वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसराला प्रातिनिधीक भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जळगाव जिल्ह्यात २ एप्रिल रोजी ८४९० हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान होऊन ४३० गावांमधील १३ हजार ४६६ शेतकरी बाधित झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे विशेषतः २७९२ हेक्टरवरील केळी बागांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद घेतली गेली. अनेक ठिकाणी ज्वारी, बाजरी, मका, ऊस, भाजीपाला, फळे यासारखी पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातही २ एप्रिल रोजी सुमारे २८४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन २६ गावांमधील ४२५२ शेतकरी बाधित झाले होते. कृषी विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, मुक्ताईनगरात सुमारे १९५१ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले असून, इतरही बऱ्याच पिकांची हानी झाली आहे.
पाहणीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती घेताना मंत्री खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत मिळवून देण्यासाठी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत, पीक विमा लाभ आणि इतर सहाय्य मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना धीर देत या संकटातून लवकर सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या या दौऱ्यात स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती पाहता तातडीने मदतकार्य सुरू करण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. एकूणच मंत्र्यांच्या या पाहणीमुळे प्रशासनाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि भरपाई देण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
