राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ जुलै रोजी येथे मेळावा होणार असून मेळाव्याच्या नियोजनाविषयी येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे होते. प्रदेश सरचिटणीस नाना महाले, महापालिका गटनेते गजानन शेलार व नगरसेविका सुषमा पगारे हेही उपस्थित होते. या वेळी ठाकरे यांनी युती सरकारच्या कारभारावर टीका करताना सरकारमुळे समाजातील कोणताच घटक समाधानी नसल्याचे नमूद केले. व्यापारी, कामगार, व्यावसायिक, किरकोळ विक्रेता हे सर्व सरकारवर नाराज आहे. शेतकऱ्यांच्या लाभार्थ सरकारने योग्य निर्णय अद्यापपर्यंत घेतलेला नाही. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. सरकार कर्जमाफीचा आकडा फुगवून दाखवत असून प्रत्यक्षात लाभार्थी संख्या कमी आहे. कर्जमाफीच्या शासननिर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. शेतकरी विरोध करत असतानाही शेतकऱ्यांची सुपीक जमीन कवडीमोल भावात घेऊन समृद्धी महामार्ग करणे सरकारला अधिक महत्त्वाचे वाटत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेची वृत्ती डबल ढोलकीसारखी आहे. शेतकऱ्यांना मदत करून त्यांची ठामपणे बाजू मांडायची असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

शनिवारी होणाऱ्या मेळाव्यास तटकरे आणि अजित पवार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने अधिकाधिक संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. बैठकीनंतर युवक पदाधिकारी, विद्यार्थी पदाधिकारी तसेच सामाजिक न्याय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.