नाशिक – ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पंचवटीतील श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने धर्मध्वज स्थापना सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने बुधवारी भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात आला. सकाळपासून पूजेला सुरूवात झाली. प्रधान आचार्य म्हणून महंत सुधीरदास महाराज, पौराेहित्य शांताराम भानोसे, पं. दिनेश गायधनी यांसह अन्य सहकाऱ्यांनी काम पाहिले. पुर्णाहूती कार्यक्रमानंतर धर्मध्वज फडकविण्यात आला.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, माजी राष्ट्रपती कोविंद यांच्यासह अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके आदी उपस्थित होते. धर्मध्वजरोहनानंतर फडणवीस यांनी साधु, महंताची भेट घेतली. माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सायंकाळी गोदाआरती करण्यात आली. या सोहळ्या करता काळाराम मंदिरात भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान, कार्यक्रम झाल्यानंतर माजी राष्ट्रपती कोविंद, रहाटकर, कांबळे यांच्या हस्ते गोदाआरती करण्यात आली. काळाराम मंदिर देवस्थान तसेच गोदाआरती कार्यक्रमानंतर पंचवटी, रविवार कारंजा, घारपुरे घाट यासह अन्य भागात वाहतुक कोंडी होती. तसेच गोदाकाठा कडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.

धर्मध्वजावर काय ?

ध्वजस्तंभ अयोध्या येथील नमुन्यावर तसेच धर्मशास्त्रावर आधारित असून सुमारे २१ फूट उंचीचा पितळी (ब्रास) स्तंभ आहे. स्थैर्य, परंपरा आणि आध्यात्मिक तेज यांचे तो प्रतीक आहे. धर्मध्वज हा भगवा (केशरी) रंगाचा असून त्याचे परिमाण अंदाजे पाच फूट बाय ११ फूट आहे. या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा तसेच जय श्रीराम, ॐ आणि चिन्ह अंकित केलेले आहे.

मुहूर्त चुकला ?

श्री काळाराम मंदिर देवस्थानच्या आवारात धर्मध्वज उभारण्याचा मुहुर्त बुधवारी दुपारी ४.४४ असा ठरला होता. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे धर्मध्वज सोहळ्यास उशीर झाला. पूजा चार वाजेपर्यंत पुर्ण पूर्ण झाली. पूर्णाहूती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होती. हा कार्यक्रम उशीरा झाल्याने ठरलेला मुहूर्त चुकला.