शफी पठाण, लोकसत्ता

कुसुमाग्रज नगरी, नाशिक : आणीबाणीविरोधी काही करावे अशा विचारांनी आम्ही एकत्र आलो होतो. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा काही काळ आम्ही अस्वस्थ झालो होतो. समविचारी मंडळी एकत्र बसू लागलो. आमच्या कामाला वेगळे स्वरूप आले. या गटासाठी मी सुचवलेले ‘ग्रुप ७७’ हे नाव स्वीकारले गेले. हे ‘ग्रुप ७७’ दडपशाहीविरुद्धचे प्रतीक होते. वर्तमानातील देशाची जी स्थिती आहे त्यात ‘ग्रुप ७७’च्या पुनरुज्जीवनाची गरज आहे, असे मत पॉप्युलर प्रकाशनचे मालक व प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत डॉ. रामदास भटकळ यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनात शनिवारी आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी ही मुलाखत घेतली.

पॉप्युलर प्रकाशनच्या प्रवासाबद्दल सांगताना डॉ. रामदास भटकळ म्हणाले, १९२४ ला पॉॅप्युलरची सुरुवात झाली. ही संस्था ९७ वर्षे भक्कम आहे. या ९७ वर्षांत अनेक चढउतार पाहिले. आपले वेगळेपण दाखवण्यासाठी पॉप्युलर हे नाव धारण केले. आजही अनेक जण पॉप्युलर नावावर आक्षेप घेतात. परंतु, असा आक्षेप चुकीचा आहे. पॉप्युलर हा शब्द मराठी नाही, असे मी मानत नाही. भाषेबद्दल व्यापक दृष्टिकोन स्वीकारले नाही तर भाषा संकुचित होईल, या महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’च्या प्रश्नावर भटकळ म्हणाले, अशा कायद्याला विरोध नाही. पण, त्याबाबत सर्वंकष विचार व्हायला हवा. याच क्रमात गांधी -सावरकर, गांधी – आंबेडकर, गांधी -जीना या तीन पुस्तकांचे काम सुरू आहे. प्रकाशक झाले नसते तर काय केले असते, या प्रश्नावर भटकळ म्हणाले, नाटक माझे पहिले प्रेम असले तरी मी दिग्दर्शकच झालो असतो. या वेळी भटकळ यांनी श्री. पु., ह. वी. मोटे यांचा त्यांच्यावरील प्रभाव व तो टाळून आपली नवीन ओळख निर्माण केल्याचे दाखलेही दिले. शेवटी त्यांनी मुलाखतकारांच्या आग्रहावरून एक सुंदर बंदिशपण ऐकवली.

भ्रष्टाचार करून मोठे व्हायचे नाही..

मी वृत्तीने अभ्यासक आहे व्यावसायिक नाही. पाप्युलर प्रकाशन मी संस्था म्हणूनच चालवली. पॉप्युलर बुक डेपोमधून जे कार्य करता येत नव्हते ते पॉप्युलर प्रकाशनच्या रूपाने केले. सर्वेसर्वा हे बिरुद मला आवडत नाही. कधी दुसऱ्या प्रकाशकांचे ग्राहक पळवले नाहीत. भ्रष्टाचार करून मोठे व्हायचे नाही. मी गुणवत्तेवरच माझी पुस्तके विकली आहेत. कधी मासिक काढले नाही. कारण, त्यासाठी जाहिरातदार शोधावे लागतात. मला असे दुसऱ्यावर अवलंबून राहणे आवडत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भटकळ यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत टकले यांनी केले.