अभिषेकासाठी हंडाभर पाणी आणण्याचे आवाहन
श्री रामनवमीनंतर तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी शहरात निघणाऱ्या रामरथ आणि गरुड रथोत्सवावर यंदा दुष्काळाचे सावट दाटले आहे. रथोत्सवांतर्गत दरवर्षी रामकुंडावर उत्सवमूर्तीना अभिषेक घातला जातो. दुष्काळामुळे रथोत्सवासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडणे अशक्य आहे. या पाश्र्वभूमीवर, नाशिककरांनी यंदाच्या रथोत्सवांतर्गत हंडाभर पाणी घरून आणावे आणि रामकुंड येथे रामावर अभिषेक करावा, यादृष्टीने श्री काळाराम मंदिराच्या पूजाधिकारी घराण्याने नियोजन केले आहे. टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या ग्रामोत्सवात प्रथमच असा वेगळा मार्ग अनुसरला जाईल.
श्री काळाराम मंदिर देवस्थानतर्फे दरवर्षी गुढी पाडव्यापासून वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. कामदा एकादशीला रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढली जाते. या रथोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्णत्वास गेली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने गरुड रथाच्या चाकांना नवीन धावा लावण्यात आल्या. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून दुपारी चार वाजता मिरवणूक निघणार आहे. रथोत्सवाचे मानकरी हेमंतबुवा पूजाधिकारी राहतील. त्यांच्या हस्ते दुपारी चार वाजता उत्सव मूर्ती रथात विराजमान केल्या जातील. राम रथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालीम संघ तर गरुड रथ ओढण्याचा मान अहिल्याबाई व्यायामशाळेकडे आहे. विविध भागातून मार्गस्थ होऊन ही मिरवणूक रामकुंडावर येते. या ठिकाणी उत्सव मूर्तीना गोदावरीत स्नान घालण्याची परंपरा आहे. यंदा गोदापात्र शुष्क झाले आहे. गंगापूर धरणाने तळ गाठल्याने पाणी सोडणेही अवघड आहे. गेल्या काही महिन्यापासून रामकुंडात पाणी नसल्याने देशभरातील भाविकांना पूजाविधी करताना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या एकंदर स्थितीवर मध्यंतरी टँकरचालकांच्या मदतीने तात्पुरता तोडगा शोधण्यात आला. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून संबंधितांनी टँकरद्वारे पाणी रामकुंडात ओतले. सध्या रामकुंडात पाणी असले तरी त्याची अवस्था फारशी चांगली नाही. या स्थितीमुळे रथोत्सवात अभिषेकासाठी शुद्ध पाणी कसे उपलब्ध होईल, हा प्रश्न उपस्थित झाला.
त्यावर काळाराम मंदिर पूजाधिकारी घराण्याने तोडगा सुचविला आहे. रामकुंड येथे रामाच्या अभिषेकासाठी शहरवासीयांनी घरून हंडाभर पाणी घेऊन येण्याचे आवाहन रथोत्सवाचे नियोजन करणारे देवस्थानचे विश्वस्त देवेंद्र पुजारी यांनी केले.
रथोत्सवात स्नानासाठी बहुदा प्रथमच असा मार्ग अनुसरला जाईल. या माध्यमातून हा उत्सव सर्वसमावेशक होणार असल्याचे पुजारी यांनी नमूद केले.

रथावर लोकप्रतिनिधींना प्रतिबंध करावा
रथोत्सवात रथावर बसण्याचा मान काळाराम मंदिर पुजारी घराण्याकडे आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत रथावर उभे राहण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि देवस्थानशी संबंधित इतर घटकांची चढाओढ सुरू असते. वास्तविक, मिरवणुकीत देवतांचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक लोटतात. रथावरील गर्दीमुळे त्यांना मूर्तीऐवजी लोकप्रतिनिधींचे दर्शन घ्यावे लागते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, रथोत्सवाच्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्यांची कमतरता राहणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने रथावर होणारी गर्दी योग्य नाही. यामुळे रथावर लोकप्रतिनिधींसह इतरांना गर्दी करण्यास प्रतिबंध करावा, अशी भाविकांची भावना आहे.

रामनवमी, रथोत्सवानिमित्त वाहतुकीवर र्निबध
पंचवटीतील काळाराम मंदिरात शुक्रवारी श्री राम जन्मोत्सव साजरा होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, या दिवशी सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच रविवारी रथोत्सवाच्या दिवशी मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून नागचौक, लक्ष्मण झुला पूल, जुना आडगाव नाका, गणेश वाडी रस्ता, नेहरू चौक, चांदवडकर गल्ली, धुमाळ पॉइंट, मेनरोड, बोहोरपट्टी, सराफ बाजार, भांडी बाजार, म्हसोबा पटांगण, सांडवा देवी मंदिर, भाजी बाजार, रामकुंड ते परशुराम पुरिया रोड, शनि चौक, हनुमान चौक, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा हा मिरवणूक मार्ग आहे. या दिवशी दुपारी तीन वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत उपरोक्त मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.