नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिक येथील अरण्यानी बायोकन्झर्व्हेशन सोसायटी यांच्या सहकार्याने विद्यापीठ परिसरात मंगळवारी करण्यात आलेल्या गणनेत सूमारे ५० प्रजातींचे २७० पक्षी आढळून आले.
पक्षांना योग्य निवारा, खाद्य व अधिवास मिळाला तर पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या पक्षी गणणेत ’हयुम्स वॉर्बलर’ हा अत्यंत दुर्मिळ पक्षी नाशिकमध्ये पहिल्यांदा पहावयास मिळाला.
विद्यापीठ परिसरात जैवविविधता सर्वेक्षण शिबीर घेण्यात आले. याअंतर्गत विद्यापीठाच्या आवारात अभ्यासकांच्या मदतीने पक्षीगणणा पार पडली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी, आरोग्य विद्यापीठ हे केवळ आरोग्य शिक्षणाचे केंद्र नसून, निसर्ग संवर्धनासाठीही तितकेच सजग असल्याचे सांगितले. या पक्षी गणना शिबिराच्या माध्यमातून विद्यापीठाच्या परिसरातील जैवविविधतेची वैज्ञानिक माहिती संकलित करत आहोत. अरण्यानी संस्थेच्या सहकार्याने आयोजित हा उपक्रम विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अरण्यानी बायोकन्झर्व्हेशन सोसायटीचे सल्लागार सतीश गोगटे यांनी, विद्यापीठ परिसरात विविध दुर्मिळ प्रकारचे पक्षी आढळत असून गणनेत सूमारे ५० प्रजातींचे २७० पक्षी आढळून आल्याचे सांगितले. पक्ष्यांना योग्य निवारा, खाद्य व अधिवास मिळाला तर पक्षांची संख्या वाढण्यास मदत होते. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यापीठात पक्ष्यांसह किटक, सरपटणारे प्राणी व अन्य प्रजातींचा वावर मोठया प्रमाणात आहे.
पक्षी गणनेच्या माध्यमातून ई-बर्ड या ऑपद्वारा माहिती अद्ययावत करण्यात येते. ती जगभरातील पक्षी अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या पक्षी गणनेत ’हयुम्स वॉर्बलर’ हा अत्यंत दुर्मिळ पक्षी नाशिकमध्ये पहिल्यांदा पहावयास मिळाला. समुद्रसपाटीपासून ३,५०० मीटर उंचीपर्यंतच्या पर्वतीय जंगलांमध्ये हा पक्षी आढळतो. चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी असून तो गाणे गुणगुणल्यासारखा उच्च स्वरात आवाज करतो. त्याच्या झाडांवरील जीवनशैलीमुळे आणि रंगांमुळे त्याला पाहणे कठीण होते. तो सतत हालचाल करत असतो. काराकोरमपासून पूर्वेकडे आणि उत्तरेकडे मंगोलियातील अल्ताई पर्वतांपर्यंत त्याचा अधिवास अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठ परिसरात पक्षी निरीक्षणाच्या सर्वेक्षणात पारवा, भारद्वाज, पाकोळी, टिटवी, लहान बगळा, ढोकरी, शिकाऱ्या, दलदल हरीण, घार, वेडा राघू, खंड्या, तांबट, पहाडी पोपट, लहान निखार, हळद्या, सुभग, नाचण, कोतवाल, स्वर्गीय नर्तक, लांब शेपटीचा खाटीक, कावळा आणि त्यांच्या वैभवशाली शेपटीसह असंख्य मोर असे सुंदर पक्षी दिसले. या उपक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या शिबिरात सतीश गोगटे, मनिष गोडबोले, गणेश वाघ, गंगाधर आघाव, रोहित मोगल, पद्मजा ओतुरकर आदी पक्षीमित्र सहभागी झाले होते.
