नाशिक – निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव तथा पक्षी अभयारण्यात सामान्यतः कीटकभक्षी मानल्या जाणाऱ्या राखी कोतवाल या पक्ष्याने चष्मेवाला या लहान पक्ष्याची शिकार केल्याची दुर्मीळ घटना प्रत्यक्ष पाहण्यात आली. हे महत्त्वपूर्ण निरीक्षण पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हजारो पक्षी देशासह परदेशातून येत असतात. हिवाळ्यात परदेशातून येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या अधिक असते. नाशिक जिल्ह्यातील हे एकमेव पक्षी अभयारण्य आहे. पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी अभयम्ण्याला भेट देत असतात. या अभयारण्यात पक्ष्यांशी संबंधित अनेक घटना प्रत्यक्ष पाहण्यास मिळतात. असाच प्रकार पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांच्या नजरेस पडला. सामान्यतः कीटकभक्षी मानल्या जाणाऱ्या राखी कोतवाल या पक्ष्याने चष्मेवाला या लहान पक्ष्याची शिकार केल्याची दुर्मीळ घटना त्यांच्या पाहण्यात आली.

पक्षीशास्त्रीय दृष्टीने ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राखी कोतवाल हा प्रामुख्याने कीटकभक्षी पक्षी असून उडते कीटक, भुंगे, अळ्या, मुंग्या, उदई आणि कोळी हे त्याचे भक्ष्य असते. हवेत उडत असतानाच कीटक पकडणे ही त्याची खास शिकारी पद्धत आहे. त्यामुळे लहान पक्ष्यांची शिकार करणे, हे या जातीसाठी सामान्य वर्तन मानले जात नाही.

पक्षीशास्त्रात अशा घटनांना संधी मिळाल्यास होणारी अपवादात्मक शिकार असे संबोधले जाते. कोतवाल कुळातील काही जाती कधीकधी छोट्या पक्ष्याची शिकार करतात. मात्र राखी कोतवाल कडून थेट लहान पक्ष्याची शिकार होणे फारच क्वचित नोंदवले गेले आहे. त्यामुळे प्रा. आनंद बोरा यांनी केलेले हे निरीक्षण अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

अन्नसाखळीतील तात्पुरती कमतरता, ऋतुबदल, हवामानातील चढउतार किंवा कीटकसंख्येत घट, पक्ष्यांना ऊर्जेची तातडीची गरज, प्रजननपूर्व काळात किंवा क्षेत्ररक्षण करताना वाढलेली आक्रमकता,पर्यावरणीय बदल व मानवी हस्तक्षेप आणि अधिवासातील बदल, कीटकनाशकांचा वापर, शहरीकरण यामुळे त्याच्या वर्तनामध्ये बदल होण्याची शक्यता प्रा. बोरा यांनी व्यक्त केली. चष्मेवाला हा आकाराने लहान, शांत स्वभावाचा पक्षी असून तो प्रामुख्याने फळे, मध व लहान कीटक खातो. सामाजिक आणि निरुपद्रवी असल्याने संधीसाधू शिकारीस तो सहज बळी पडू शकतो. पक्ष्यांना संरक्षण देणारा पक्षी म्हणून कोतवाल हा पक्षी ओळखला जात असला तरी कधी तो असे कृत्य करून चकित देखील करीत असतो.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात राखी कोतवाल या पक्ष्याकडून चष्मेवाला पक्ष्याची शिकार ही एक अपवादात्मक पण अभ्यासपूर्ण घटना असून, बदलत्या निसर्गस्थितीत पक्ष्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल समजून घेण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. ऋतुबदल, हवामानातील चढउतार किंवा कीटकसंख्येत घट देखील कारणे त्याच्या बदलात असू शकतात, असे निरीक्षण पक्षी अभ्यासक प्रा.आनंद बोरा यांनी नोदंविले आहे.