नाशिक – नाशिकमधील माध्यमिक विद्यार्थ्यांमधील क्रिकेट गुणवत्तेला पुढे आणण्यासाठी रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने दरवर्षी प्रतिष्ठित रासबिहारी क्रिकेट ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट

स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धैला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन दशकांपासून ही स्पर्धा नाशिकमधील शालेय संघांना उत्कृष्ट स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या स्पर्धेतून अनेक गुणवंत क्रिकेटपटू पुढे येत आहेत. त्यामुळे रासबिहारी क्रिकेट ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धैला नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रात एक मानाचे स्थान मिळाले आहे. यंदाच्या स्पर्धेत नाशिकमधील एकूण १६ शाळांनी सहभाग घेतला आहे.

सध्या क्रिकेटला क्रीडा क्षेत्रात महत्व प्राप्त झाले आहे. क्रिकेटमध्ये मिळणारा पैसा, आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारी प्रसिध्दी, आयपीएलप्रमाणेच अशा प्रकारच्या स्पर्धा अबुधाबी, दुबई, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज या देशांमध्येही होत असल्याने एक क्रिकेटपटू म्हणून चांगली कामगिरी केल्यास अशा स्पर्धांमध्ये त्यांची निवड होऊ शकत असल्याने क्रिकेट सध्या कोणत्याही क्रिकेटपटूचा आवडीचा विषय झाला आहे.

नाशिक शहरात विविध वयोगटांसाठी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने स्पर्धा होत असल्या तरी निव्वळ शाळांसाठी अशी कोणतीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमधील क्रिकेटच्या गुणवत्तेला स्थानिक पातळीवर वाव मिळत नव्हता. हे लक्षात घेत रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलने २० वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने नाशिक शहरातील शाळांसाठी आंतरशालेय रासबिहारी क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात केली. तेव्हांपासून या स्पर्धेचे वलय वाढले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या प्रारंभी कमी होती. नंतर ती वाढत गेली. सध्या १६ संघ या स्पर्धेत खेळत आहेत.

रासबिहारी क्रिकेट ट्रॉफी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे सामने नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान आणि महात्मा नगर ग्राउंड या दोन ठिकाणी खेळविले जात आहेत. या स्पर्धेला नाशिकच्या माध्यमिक विद्यालय क्षेत्रात एक वलय प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा जिेकणे, या स्पर्धेत सहभाग घेणे प्रत्येक विद्यालयासाठी मानाचे समजले जाते.

यंदाच्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून विवेदा वेलनेस रिसोर्टच्या संचालक तन्वी देवरे उपस्थित होत्या. त्या एक दूरदृष्टी असलेल्या उद्योजिका आणि उत्कृष्ट खेळाडू असून, त्यांनी २९ जून २०२४ रोजी इंग्लिश खाडी पार करण्याची कामगिरी केली आहे. त्यांनी डोव्हर (इंग्लंड) ते व्हिसांत (फ्रान्स) असा ४८ किलोमीटरचा पल्ला १७ तास ४२ मिनिटांत पोहून पूर्ण केला आहे.

उद्घाटनप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव समीर रकटे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल बिंदू विजयकुमार तसेच प्रमुख पाहुण्या तन्वी देवरे यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या वेळी स्पर्धेच्या २० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आला.