खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल (२ जून) ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. तसंच, आज माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. आज संजय राऊत त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी काल (२ जून) दिली होती. याबाबत संजय राऊतांना आज विचारले असता ते म्हणाले की, “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

थुंकल्याबद्दल माफी मागण्याबाबत संजय राऊतांना विचारले असता, ते म्हणाले की, “रोज १३० कोटी जनतेला माफी मागावी लागेल. रोज कोणी ना कोणी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली, त्यांचं नाव समोर आल्यावर माझी जीभ चावली गेली, त्यातून ती कृती झाली. यांना काही कळतं का? त्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र कळतं का? माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही. माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

मला सुरक्षा नको

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त संजय राऊतांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मला सुरक्षेची गरज नाही. मी माझ्या शिवसैनिकांसोबत त्र्यंबकला जातोय. तिथे मंदिरात जाऊन धार्मिक विधी करून परत येऊ. सुरक्षा कोणाला आहे, ज्या आमदारांनी बेईमानी केली त्यांना सुरक्षा आहे. ही सुरक्षा मी बोलावलेली नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वीर सावकरही बेईमान्यांवर थुंकले होते

मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणलं गेलं. वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा बेईमान कोपऱ्यात उभा आहे. त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणं ही संस्कृती असल्याचं दाखवून दिलं होतं. इतिहासात त्याची नोंद आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मी वीर सावरकरांचा भक्त आहे

मी वीर सावरकरांचा भक्त आहे. लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकार व्यक्त होऊ शकतो. मी थुंकलो कुठे मला दाखवा. माझा दाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यातून व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं आहे की लोक आमच्यावर थुंकत आहेत. त्यांची ही मानसिकता आहे. त्यांना झोपेतही वाटतं ही लोक आमच्यावर जोडे मारत आहेत. हे खरं आहे लोक त्यांच्यावर थुंकत आहेत. मी कशाला ते व्यक्त करु? असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rather than drowning in dams sanjay rautas strong reply to ajit pawar said despite everything we suffered sgk
First published on: 03-06-2023 at 10:40 IST