इगतपुरी पोलिसांसमोर आव्हान

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : पावसात डोंगर-दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, ढगात हरवणारी वाट अन् चौफेर धरण, गड-किल्ल्यांचे सान्निध्य. निसर्गसौंदर्याने बहरलेल्या इगतपुरी परिसरात या काळात पर्यटनाला उधाण येते. पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात असते. मुंबई-आग्रा महामार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांनाही घटकाभर कसारा घाटात थांबण्याचा मोह आवरला जात नाही. निसर्गसौंदर्याची उधळण होणाऱ्या या भागात आजवर काही हॉटेलमध्ये रेव्ह पाटर्य़ा रंगल्या होत्या. परंतु आता त्यांचा प्रवास हॉटेलकडून खासगी बंगल्यांकडे होऊ लागला आहे. त्यावर प्रतिबंध घालण्याचे पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे.

कसारा घाटालगतच्या स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यात चित्रपटसृष्टीतील एका चमूने वाढदिवसानिमित्त आयोजित रेव्ह पार्टी पोलिसांनी छापा टाकून उधळली. पार्टीत कोकेनसारखे अमली पदार्थ, हुक्क्याचे सेवन झाल्याचे स्पष्ट झाले. मद्यधुंद अवस्थेतील १२ युवती आणि १० पुरुष अशा २२ जणांना अटक झाली. अमली पदार्थ पुरविणाऱ्यास मुंबई येथून पकडण्यात आले. पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील पाच ते सहा युवतींसह एक ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक, दोन नृत्यदिग्दर्शिका तर एक विदेशी महिला अशा उच्चभ्रू वर्गाचा समावेश आहे. यापूर्वी परिसरातील मिस्ट्री आणि रेन फॉरेस्ट हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी रंगल्या होत्या. तेव्हा सधन वर्गातील संशयितांवर कारवाई झाली होती. निसर्गसौंदर्यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाच्या संधी वृद्धिंगत होत असताना दुसरीकडे अशा काही अवैध बाबींचाही शिरकाव होण्याचा धोका वाढत आहे.

नाशिक-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहतुकीला गती मिळाली. मुंबई, ठाण्याहून अवघ्या अडीच, तीन तासांत इगतपुरी गाठता येते. महामार्गामुळे आसपासच्या जमिनीला सोन्याचे भाव आले. सुखद वातावरणात वास्तव्यासाठी विकासकांनी इगतपुरी परिसरात बंगल्यांच्या अनेक योजना साकारल्या. महानगरांतील उच्चभ्रूंनी त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. यातील बरेचसे बंगले भाडेतत्त्वावर दिले जातात. वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या शेकडो बंगले, शेतघरांवर नियमितपणे लक्ष ठेवणे यंत्रणेसाठी अवघड आहे. हॉटेलमध्ये ये-जा करणाऱ्यांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. बंगल्यांकडे फारसे कुणाचे लक्ष नसते. त्याचाच गैरफायदा काही घटक घेतात. दोन बंगल्यांमध्ये रंगलेल्या पार्टीची वेळीच माहिती मिळाल्याने कारवाई करणे शक्य झाले. प्रत्येक वेळी तशी ‘खबर’ मिळेलच, याची शाश्वती नसते.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मध्यंतरी इगतपुरी भागात खासगी बंगले, शेतघर, तंबू भाडेतत्त्वावर देताना प्रत्येक पर्यटकाची नोंद ठेवणे मालकांवर बंधनकारक केले होते. पर्यटकांची संख्या, त्यांचे नाव, पत्ते, आधार किंवा अन्य ओळखपत्र, भ्रमणध्वनी, वाहन क्रमांक, पर्यटक कोठून आले, ते आल्याचा आणि गेल्याचा दिनांक, स्वाक्षरी आदी नोंदी ठेवण्यास सांगण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले. याचे किती बंगलेधारक, शेत घरधारकांनी पालन केले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

इगतपुरीतील ज्या दोन बंगल्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन करून अवैध पार्टीचे आयोजन करण्यात आले, त्याची पूर्वकल्पना मुंबईस्थित बंगला मालक रणबीर सोनीला होती. त्यामुळे या गुन्ह्य़ात त्यालाही आरोपी करण्यात आले आहे. इगतपुरी वा आसपासच्या भागात बंगले भाडेतत्त्वावर देताना मालकांनी तिथे अनधिकृत गोष्टी घडणार नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. ग्रामीण पोलिसांनी बंगले, शेत घरमालकांना पर्यटकांच्या नोंदी ठेवणे यापूर्वीच बंधनकारक केलेले आहे.  – सचिन पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)