जळगाव : ध्येयावरचा विश्वास कायम ठेवल्यास यशाची शिखरे सहजपणे गाठता येतात, हे रावेर (जि. जळगाव) येथील कांचन जयंत महाजन हिने सिद्ध करून दाखवले आहे. लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने शेतमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आईच्या या संघर्षाला कांचनच्या अथक मेहनतीची जोड मिळाली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने महिला ओबीसी प्रवर्गातून २३ वा क्रमांक मिळवत राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदाला गवसणी घातली.

कांचन महाजनचे बालपण अतिशय संघर्षमय परिस्थितीत गेले. २००७ मध्ये कांचन अवघी सात वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. अचानक कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर येऊन पडली. मात्र, मुलगा आणि मुलगी या दोघांचे शिक्षण, संगोपन आणि घरखर्चाची जबाबदारी सांभाळताना हेमलता यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आणि मुलांच्या शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले. कांचनच्या आजीनेही (आईची आई) वेळोवेळी शेतमजुरी करून लेकीच्या संसाराला आधार दिला. आजी-आईच्या या त्यागामुळे कांचनच्या शिक्षणाची वाट सुकर झाली.

दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी

आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही कांचनने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण रावेरमध्ये पूर्ण केल्यानंतर तिने सांख्यिकीशास्त्रात बी.एस्सी. आणि एम.एस्सीचे शिक्षण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणींचा सामना केला. मात्र, परिस्थितीचा बाऊ न करता ध्येय निश्चित करून त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळविले.

यश आई-आजीच्या कष्टांचे फळ

आपल्या यशाबद्दल कांचन महाजन हिने आई आणि आजीच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिचे हे यश केवळ पुस्तके, अभ्यास किंवा शिकवणी वर्गांमुळे मिळालेले नसून आई-आजीने शेतात गाळलेल्या घामाचे हे फळ असल्याचे तिने सांगितले. आईने दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून आपले आणि भावाचे शिक्षण पूर्ण केले. स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवून आईने मुलांच्या भवितव्याला प्राधान्य दिले. त्यामुळे आज आपण जे काही आहोत, त्यामागे आईचा त्याग आणि आजीचा आधार असल्याची भावना कांचनने व्यक्त केली. कांचनच्या लहान भावाने देखील एमबीए केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळत मुलांच्या शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टांचे चीज कांचनच्या यशामुळे झाले आहे.

संघर्षातून उभे प्रेरणादायी उदाहरण

कांचन महाजनची राज्य कर निरीक्षकपदी झालेली निवड ही केवळ एका विद्यार्थिनीच्या यशाची कहाणी नाही, तर आईच्या त्यागाला आणि मुलीच्या जिद्दीला मिळालेली यशाची पावती आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण तिने निर्माण केले आहे. तिच्या या यशामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोठी प्रेरणा मिळणार आहे. मेहनत, सातत्य आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असा संदेश कांचनच्या यशातून मिळतो. कांचन महाजन यांच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच रावेर परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.