जळगाव : मध्यप्रदेशातील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना वाटेत अडवून आठ लाख रुपये लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गुन्ह्यातील मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मसाले व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली हे दोघे सहा फेब्रुवारी रोजी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरातून विक्री केलेल्या मालाची वसुली करून घरी परतत होते. रात्री साधारण नऊ वाजेच्या सुमारास खानापूर चेकपोस्टजवळ आठ ते नऊ जणांनी दुचाकीवरून येत त्यांची गाडी अडवली. आणि अंधाराचा फायदा घेत आठ लाख रुपयांची बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी सात फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळी कॅमेरे नसल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने सुरुवातीला तपासात अडचणी आल्या.
सर्व संशयित बंडू चौकातील रहिवासी
पोलिसांनी रावेरसह सावदा आणि फैजपूर शहर व परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या मदतीने पोलिसांनी अखेर रावेरमधील बंडू चौक परिसरातील सात संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना लागलीच अटक करण्यात आली. फारूख शेख रईस, अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादार उर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू, साहिल खान दाऊद खान, रहेमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या, अक्रम खान इस्माईल खान (सर्व रा. बंडू चौक, रावेर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि दोन लाख ५५ हजार रुपये रोख, असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुख्य संशयित हसन फावड्या फरार
रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार सुनील वंजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार, गजानन बोने यांनी सदरची कारवाई यशस्वी केली. लुटीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहे. आठ लाखांच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित हसन फावड्या (रा. रुस्तम चौक, रावेर) हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा सर्व दिशांना कसून शोध घेत आहेत.

