धुळे : दोंडाईचा शहरातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडवत माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे निरीक्षक डॉ. रवींद्र देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना धक्का बसला असून पुढील रणनीतीबाबत पक्षामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

डॉ. देशमुख यांच्या अनपेक्षित प्रवेशानंतर दोंडाईचा-शिंदखेडा परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजित पवार गटाची दोंडाईचा शहरातील ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्ष कोणते पाऊल उचलतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कोणती दिशा ठरवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा दोंडाईचा आणि शिंदखेडा तालुक्यात प्रभाव असून भाजपात प्रवेश केलेले डॉ. रवींद्र देशमुख हे त्यांचे बंधू असल्याने देशमुख कुटुंबाचा एकत्रित राजकीय प्रभाव आता मंत्री जयकुमार रावल यांच्या बाजूने जाणार असल्याचे स्पष्ट दिसते. या घडामोडीमुळे अजित पवार गटापुढे दोंडाईचा तसेच शिंदखेडा परिसरात संघटना मजबूत ठेवण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.

अलीकडच्या काळात या मतदारसंघात अजित पवार गट सक्रिय झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जोरदार तयारी करताना निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. रवींद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच नुकतीच राज्य प्रवक्ते म्हणून शामकांत सनेर यांची नियुक्तीही झाली होती. या पार्श्वभूमीवरच मंत्री रावल गटाने योग्य संधी साधत देशमुख यांचा भाजप प्रवेश घडवून आणला असून यामुळे दोंडाईचा शहरातील अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात ढासळली आहे.

दोंडाईचा-शिंदखेडा मतदारसंघात अनेक वर्षे सुरू असलेली रावल-देशमुख कटुता या प्रवेशानंतर मिटल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. त्यामुळे आगामी दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण असून दोंडाईचा शहरातील संभाव्य उमेदवारांपैकी दोन प्रमुख चेहरे डॉ. रवींद्र देशमुख आणि रवींद्र जाधव या दोघांनीही भाजपात प्रवेश केल्याने पक्षाचे सर्व अंतर्गत गणित कोलमडले आहे.

प्रदेश पातळीवर महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत स्पष्टता नसतानाही दोंडाईचा शहरात रावल-देशमुख एकत्र येण्यामुळे स्थानिक राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. हेमंत देशमुख यांनी रावल यांना पाठिंबा दिला होता; मात्र स्थानिक नाराजीनंतर भाजपला त्याचा फटका बसला होता. यंदा तसे होऊ नये म्हणून भाजप अधिक सावध पवित्र्यात आहे.

शिंदखेडा आणि शिरपूर येथे भाजप-शिंदे गटाची औपचारिक युती नसल्याने निर्माण झालेली गटबाजी लक्षात घेता आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व परिस्थितीत रावल-देशमुख समझोता दोंडाईचा शहरातील निवडणुकीचा निर्णायक मुद्दा ठरत आहे.

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्य प्रवक्ते शामकांत सनेर यांनी सांगितले की, दोंडाईचा येथील वास्तव स्थितीची संपूर्ण माहिती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना देण्यात येईल.