नाशिक – कथित पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष असणाऱ्या रवींद्र एरंडे याला महिला लैंगिक शोषण प्रकरणी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी पोलीस तपासात सहकार्य करीत नसून त्याच्याकडून अनेक महत्वाच्या मुद्यांवर माहिती अपेक्षित असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.
सातपूर येथील एका महिलेचे मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवित एरंडेने लैंगिक शोषण केले. यासंदर्भात संबंधित महिलेने तक्रार केल्यावर एरंडेविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गरजू अनेक महिलांचे एरंडेने शोषण केल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या कार्यालयातील तपासणीत १२० हून अधिक आक्षेपार्ह चित्रफिती पोलिसांना आढळून आल्या.
पोलिसांनी एरंडेच्या घराचीही झडती घेतली. कार्यालयात आणि घरात काही नोंदी, महत्वाची कागदपत्रे, प्राण्यांचे अवयव आढळून आली. त्या चित्रफिती विषयी एरंडे मौन बाळगून आहे. न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यास पुन्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले.
प्राण्यांचे अवयव कोणत्या गोष्टींसाठी वापरले जाता होते, याची माहिती आरोपी देत नाही. तसेच त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सात महिलांच्या १२० चित्रफिती आहेत. त्या महिलांची ओळख पटविण्यात येत आहे.
चित्रीकरणासाठी कुठले साहित्य वापरण्यात आले, याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही. तपास अधिकारी सचिन बारी यांनी, एरंडेविरूध्द केवळ एक पीडित महिला पुढे आली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या चित्रफितीच्या माध्यमातून पीडित महिलेची ओळख पटवून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. एरंडेचे अन्य काय उद्योग सुरू होते, याचीही माहिती घेतली जात आहे. पीडित महिलांनी पुढे यावे. त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन बारी यांनी केले आहे.
पोलिसांचे आवाहन
रवींद्र एरंडे याने विविध महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत चित्रिकरण केल्याले उघड झाले आहे. संशयित एरंडेविरोधात पीडित महिलांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात तक्रारीसाठी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी (९०४९८७२८२२) वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे (९८२३२३४१७६), सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे (७७७४००२७१०) यांच्याशी संपर्क साधावा.
