नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ व लोकप्रिय जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पांडुरंग पगार (६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह नाशिक जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.कार्यकर्त्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र पगार यांच्या पार्थिवावर बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे बुधवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
आज रवींद्र (नाना) पगार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात ठेवण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले .आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा अर्ध्यावर उतरवून रवींद्र पगार यांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांनी पगार यांच्या आठवणींना उजाळा दिला.. रवींद्र गार यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत, कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख नेतृत्व गमावले असून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची उणीव कायम भासणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबीयांवर व नातेवाईकांवर ओढवलेल्या या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व कार्यकर्ते सहभागी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ॲड. रवींद्र पगार यांचे मूळ गाव बागलाण तालुक्यातील उत्राणे हे आहे. या लहानशा गावातून त्यांनी घेतलेली राजकीय झेप सर्वांना थक्क करणारी आहे. मूळचे काँग्रेसी विचारधारेचे रवींद्र पगार यांनी बागलाण तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेस पसरविण्यास हातभार लावला. काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही रवींद्र पगार यांनी काही वर्षे काम पाहिले. त्यांच्या कामाची धडाडी पाहून त्यांच्याकडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही देण्यात आले. त्यावेळी काँग्रेसला भरभराटीचे दिवस आणण्यातही त्यांचे योगदान होते.
१९९९ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर रवींद्र पगार यांचेही मन काँग्रेसमध्ये रमले नाही. त्यांनी नाशिक येथे सर्वप्रथम शरद पवार यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ मेळावा घेतला होता. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तसेच काही जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. राजकीय संघटनात्मक कामाचा सुमारे ४० वर्षांचा अनुभव असलेल्या रवींद्र पगार यांनी नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही काम पाहिले होते. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. परंतु, अवघ्या काही मतांनी त्यांना संचालकपदापासून दूर राहावे लागले होते. २०१२ पासून रवींद्र पगार हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर रवींद्र पगार यांनी अजित पवार यांना साथ दिली. अजित पवार यांनी रवींद्र पगार यांच्याकडेच आपल्या गटाचेही जिल्हाध्यक्षपद कायम ठेवले. मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून ते गणले जात. त्यामुळे रवींद्र पगार यांचे निधन हा भुजबळ कुटुंबियांवरही आघात मानला जात आहे. रवींद्र पगार हे सुसस्वभावी आणि मनमिळाऊ म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.

