नंदुरबार – स्वांतंत्र्यांच्या इतिहासात दुर्लक्षित नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी सत्याग्रह स्थळाचा कायापालट करण्याची योजना सार्वजनिक बांधकाम विभागाने आखली आहे. यासाठी जवळपास ६० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शासन दरबारी हा आराखडा सादर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथे 02 मार्च १९४३ रोजी ब्रिटीश अधिकारी कॅप्टन ड्युमन याच्या आदेशावरुन झालेल्या गोळीबारात १४ आदिवासी क्रांतीकारांना वीरमरण आले. 04 मार्च रोजी तळोदा तालुक्यातील मोरवड (रंजनपूर) येथे महाशिव रात्री निमित्ताने आरती पूजन होते. दोन वर्षाची हद्दपारच्या शिक्षेची मुदत संपण्याआधीच आदिवासी क्रांतिकारकांचा समूह मध्य प्रदेश मार्गे 24 फेब्रुवारीला अक्राणी किल्यात पोहोचला. २ मार्च १९४३ रोजी संत रामदास महाराज यांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांचा समुह मोरवडकडे निघाला.
मोरवड येथे आरती पूजना नंतर हा समूह चले जाओ चा चळवळीत सामील होणार होता. हातबारी जवळील रावळपाणीच्या निझरा नदीच्या पात्रात हा समुह मुक्कामी थांबलेला असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुमारे ८३ वर्षांपूर्वी झालेल्या या अमानुष अशा बेछुट गोळीबाराच्या खुणा आजही या ठिकाणच्या दगडांवर काळ्या दिवसाची साक्ष देत आहेत. या गोळीबारामुळे निझरा नदीचे पाणी दोन दिवस लाल झाले होते. जवळपास महिनाभर याठिकाणी गिधाडांचे वास्तव्य होते, असे इतिहासातील जाणकार सांगतात. आदिवासी बांधवांचा इंग्रजांविरोधातील हा सत्याग्रह दुर्लक्षितच राहिला. या अमानुष घटनेतील शहिदांना दरवर्षी श्रद्धांजली वाहिली जाते. याठिकाणी आरतीपूजन करुन या घटनेतील हौतात्मांना अभिवादनासाठी डोंगरदऱ्यांमध्ये गुलाब महाराज यांच्या आप परिवाराचे अनुयायी दरवर्षी शेकडोच्या संख्येने येतात. काही वर्षांपासून शासनाकडून रावलापाणीच्या दुर्लक्षित सत्याग्रहाची दखल घेण्यात येऊ लागली.
तळोदा- शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणच्या स्मृती स्थळाचा कायापालट करण्यासाठी सुमारे ६० कोटींचा आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत रावलापाणी येथे अद्यापत ग्रंथालय, ॲम्पिथिएटर तयार केले जाणार आहे. शिवाय शहीद स्मारकाची उभारणी तसेच संग्रहालय निर्मितीदेखील केली जाणार आहे. याशिवाय निझरा नदीकाठी वॉक वे, रावलापाणी बेछुट गोळीबाराचे प्रतिक असलेल्या कमानी आणि तत्सम सुविधा देखील याठिकाणी केल्या जाणार आहेत मुळात यामुळे दुर्लक्षित आणि प्रकाशझोतात नसलेल्या रावलापाणीच्या शहीद स्मृती स्थळाळा नवीन झळाळी मिळणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या अद्यावत सुविधांमुळे पर्यटकांचा देखील या ठिकाणी वावर वाढणार असून यातून इतिहासातील या शहिदांची आठवण आणि माहिती नव्या पिढीला मिळणार आहे. हा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात आला असून त्याचे शासन स्तरावर सादरीकरण करण्यात आले आहे.
