सर्वच धरणे तुडूंब असताना पावसाचा जोर कायम असल्याने या हंगामात नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत तब्बल १०४ टीएमसी पाणी प्रवाहीत झाले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे १०२ टीएमसी क्षमतेचे विशाल धरण आहे. त्यात ७६ टीएमसी जिवंत तर २६ टीएमसी मृतसाठा असतो. गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातील अतिरिक्त पाणी गोदावरीतून नांदूरमध्यमेश्वरमार्गे मराठवाड्याकडे जाते. या हंगामात जायकवाडी तुडूंब होऊन ओसंडून वाहील, इतका विक्रमी विसर्ग झाल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. ४६ वर्षांच्या इतिहासात इतका विसर्ग होण्याची ही पाचवी वेळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील आकारमानाने मोठ्या असलेल्या धरणांपैकी जायकवाडी हे एक मानले जाते. कमी पावसाच्या काळात समन्यायी तत्वाने पाणी वाटपाच्या मुद्यावरून मराठवाडा, नाशिक, नगरमध्ये संघर्ष होतो. या हंगामात अडीच महिन्यांपासून चाललेल्या मुसळधार पावसाने तशी कुठलीही शक्यता ठेवली नाही. उलट इतका विसर्ग झाला की, जायकवाडीलाही अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने नाशिकमधील सर्वच धरणांच्या विसर्गात पुन्हा वाढ करावी लागली. गोदावरी, दारणा, कादवासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. कधी मुसळधार तर कधी अतिवृष्टीची मालिका सुरू असल्याने अनेक धरणातून वारंवार पाणी सोडावे लागत आहे.

हेही वाचा : सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

धरणात प्रत्येक महिन्यात किती जलसाठा करायचा याचे वेळापत्रक असते. जलाशय परिचालन सुचीनुसार तो केला जातो. सद्यस्थितीत लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये ६४ हजार ५१३ दशलक्ष घनफूट म्हणजे ९८ टक्के जलसाठा आहे. म्हणजे सर्वच धरणे तुडूंब आहेत. या काळात अधिक सतर्कता बाळगावी लागते. एकाही धरणात पाणी साठविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पावसावर लक्ष ठेऊन पुढील काही तासात धरणात येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेत विसर्ग कमी-अधिक करावा लागत आहे. सध्या गंगापूर, दारणा, मुकणे, वालदेवी, कडवा, आळंदी, भोजापूर, पालखेड, ठेंगोडा, करंजवण, चणकापूर, हरणबारी अशा अनेक धरणांमधून विसर्ग होत आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून सोमवारी सकाळी ४५ हजार ६५४ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

विक्रमी विसर्ग कधी ?

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार सोमवारी सकाळपर्यंत नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून हंगामात एक लाख चार हजार ७१ दशलक्ष घनफूट म्हणजे १०४ टीएमसी इतका विसर्ग सोडण्यात आला. १९७६ ते २०२२ या काळात केवळ पाच वेळा बंधाऱ्यातील विसर्गाने १०० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. १९८१ च्या पावसाळ्यात (१३० टीएमसी), नंतर २४ वर्षांनी म्हणजे २००५ मध्ये (१७० टीएमसी), २००६ (१६२ टीएमसी), २०१९ मध्ये (१२२ टीएमसी) असा विसर्ग झाल्याची आकडेवारी आहे. जायकवाडी धरणाची प्रचंड क्षमता लक्षात घेतल्यास ते तुडूंब होऊन ओसंडण्याची शक्यता कमी असते. या वर्षीच्या विक्रमी विसर्गाने तो मुद्दा निकाली निघाला आहे.

हेही वाचा : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

दुष्काळी वर्षात विसर्ग कमी

पावसाने ओढ दिल्यामुळे अनेकदा नाशिक जिल्ह्यातील धरणेही पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमधूनही खालील भागात फारसा विसर्ग होत नाही. त्यात मुख्यत्वे १९८७ च्या हंगामात (६६१ दशलक्ष घनफूट), १९९५ मध्ये (४६० दशलक्ष घनफूट) म्हणजे एक टीएमसीपेक्षा कमी तर २००० साली (१२०० दशलक्ष घनफूट) केवळ १.२ टीएमसी इतका विसर्ग झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record discharge of 104 tmc water during the peak season in jayakwadi dam nashik tmb 01
First published on: 19-09-2022 at 10:10 IST