scorecardresearch

पोलिसात भरती होण्याची जिद्द, पण अडचणीही अधिक

नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी सोमवारपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. विविध पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.

पोलिसात भरती होण्याची जिद्द, पण अडचणीही अधिक
लोकसत्ता टीम

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी सोमवारपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. विविध पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. पोलीस चालक पदासाठी एक हजार अर्ज आले. पोलीस दलात भरती व्हायचे हे स्वप्न डोळ्यात ठेवत नाशिकसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून, तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस दलातील चालक पदाच्या भरतीसाठी हजारो जण धावले.

सोमवारी सकाळी सहापासूनच भरतीसाठी चाचणी प्रक्रिया सुरू होणार असल्याने औरंगाबाद, नांदगावसह अन्य भागांतून येणाऱ्या उमेदवारांनी रविवारी सायंकाळीच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय गाठले होते. काहींनी मुख्यालयाजवळ असलेल्या मैदानावर थंडीत कुडकुडत मुक्काम ठोकला. काही बस स्थानकावर झोपून राहिले. सकाळी मिळेल त्या वाहनाने पोलीस मुख्यालयाचे मैदान गाठले. चाचणी सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. चाचणीसाठी बाहेर गावहून आलेल्या उमेदवारांनी आपल्यासोबत आणलेली शिदोरी इतर सहकाऱ्यांसोबत खाल्ली. पोलीस विभागाकडून केवळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा – नाशिक येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन

सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवारांची चाचणी सुरू होती. उमेदवारांनी सादर केलेले काही अर्ज कागदपत्रातील त्रुटींअभावी बाद झाले. सोमवारी सकाळी १६०० मीटर धावणे, गोळाफेक यात उमेदवारांची शारीरिक क्षमता जोखण्यात आली. सकाळी तसेच ऊन उतरल्यावर धावण्याची चाचणी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दुपारीही उमेदवारांना धावावे लागले. थंड हवामानामुळे उन्हाचा त्रास उमेदवारांना झाला नसला तरी ताकद कमी पडल्याने ज्या ठराविक वेळेत अंतर पार करणे अपेक्षित होते, त्याला वेळ लागल्याची तक्रार काहींनी केली. चाचणी प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.

ज्या उमेदवारांनी नाशिक ग्रामीण येथे भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले आहेत. त्यांना महाआयटीकडून प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी ओळखपत्राच्या दोन प्रती, अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींचा संच, तसेच पासपोर्ट आकाराच्या सहा छायाचित्रांसह त्यांना बोलावलेल्या दिवशी सकाळी सहा वाजता आडगाव पोलीस मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Jindal Fire Accident : दुर्घटनास्थळी पोहोचण्यात अवरोध ; आगीचे कारण स्पष्ट होण्यास वेळ लागण्याची चिन्हे

बारावीची परीक्षा झाऱ्यावर पोलीस दलात भरती होण्याच्या विचाराने सरावाला सुरुवात केली. एक वर्षाहून अधिक काळापासून भरतीसाठी सराव सुरू ठेवला आहे. आज परीक्षा दिली. काही अडचणी आल्या. काय होईल माहिती नाही, ही बोलकी प्रतिक्रिया नाशिक येथे ग्रामीण पोलीस भरतीसाठी आलेल्या सुनील मंडलीक यांनी दिली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 09:48 IST

संबंधित बातम्या