धुळे : शहरातील आग्रा रोडवरील पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या चारही मार्केटच्या पुनर्विकासाचा बहुप्रतिक्षित मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, थकबाकीदार व्यापाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. तब्बल १७ कोटी रुपयांची थकबाकी भरल्याशिवाय नव्या व्यापारी संकुलात कोणालाही गाळा मिळणार नाही, असे ठाम निर्देश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.

पाचकंदील परिसरातील चारही मार्केटमध्ये एकूण ३८६ गाळे व ओटेधारक व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांकडून महापालिकेला करांसह एकूण २२ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी होती. प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर आतापर्यंत चार कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा झाला असून, अद्याप १७ कोटी ९७ लाख रुपये येणे बाकी आहेत. थकबाकी पूर्णपणे भरणाऱ्या व्यापाऱ्यांनाच पुनर्विकासानंतरच्या नव्या मार्केटमध्ये जागा दिली जाईल, असा स्पष्ट निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबाबत मंगळवारी महापालिका सभागृहात व्यापारी व प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला चारही मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. आयुक्त नितीन कापडणीस यांनी थकबाकीबाबत कठोर भूमिका मांडताना, हा प्रकल्प रखडण्यास थकबाकी हेच प्रमुख कारण असल्याचे नमूद केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ६० ते ७० टक्के व्यापाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेत थकबाकी भरण्यास सुरुवात केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मार्केटच्या पुनर्विकासाचे काम एका वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. यासाठी लवकरच ठेकेदारांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, कामाच्या टप्प्यांबाबत सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या प्रकल्पाच्या निविदेला मान्यता देण्यात आली असून, ठेकेदाराशी करारनामा करून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आधुनिक आणि टिकाऊ बांधकाम पद्धतीचा अवलंब करून हे मार्केट उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

१५ दिवसात कामाला सुरुवात

बांधकामाच्या काळात व्यापाऱ्यांचे स्थलांतर करण्यात येणार असून, त्यासाठी चार पर्यायी जागांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका शाळा क्रमांक चार, महापालिका शाळा क्रमांक पाच, जेल रोड परिसर आणि क्युमाईन क्लबलगतचा परिसर यांचा समावेश आहे. या ठिकाणी आवश्यक आखणी करून तात्पुरत्या स्वरूपात गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांना १५ दिवसांच्या आत स्थलांतर करावे लागणार असून, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. आयुक्तांच्या दालनात व्यापाऱ्यांची आणखी एकदा अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत करारनामा अंमलबजावणी, जीएसटी संदर्भातील सवलत, तसेच महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या हमीपत्राबाबत स्पष्टता दिली जाणार आहे. या बैठकीतील चर्चेनंतरच अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अत्याधुनिक मार्केट

बैठकीत आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले की, नवीन मार्केट अत्याधुनिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले असून, व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुनर्विकासानंतर व्यापाऱ्यांचे हक्क अबाधित राहतील आणि ज्या ठिकाणी पूर्वी गाळे होते, त्याच ठिकाणी संबंधित व्यापाऱ्यांना गाळे दिले जातील. व्यापाऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे अधिकृत हमीपत्र देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, पुनर्विकासाच्या कालावधीत व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवसायावर कमीतकमी परिणाम होईल, यासाठी महापालिकेकडून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पर्यायी जागांवर पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षेची योग्य व्यवस्था केली जाणार असून, कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासन व व्यापारी प्रतिनिधी यांच्यात सातत्याने समन्वय ठेवून निर्णय घेतले जातील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. येत्या पंधरा दिवसांत व्यापाऱ्यांच्या उपस्थितीतच नव्या मार्केटचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.