लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी अपार आयडी काढण्याची सूचना करण्यात आली होती. लवकरच इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून त्यांच्या बैठक क्रमांकाआधी अपार आयडी क्रमांकाची नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या वेळी डिजिटल लॉकरवर गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अपार आयडीची नोंदणी करण्याबाबत सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. नाशिक विभागातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५५ टक्के विद्यार्थ्यांचे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील ७० टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढून झाले आहे.

ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अपार आयडीची नोंद अद्याप विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकापुढे केलेली नाही. अशा शाळा, महाविद्यालयांनी उपलब्ध अपार आयडीची नोंद मंडळाच्या संकेतस्थळावर बैठक क्रमांकापुढे करावी. जेणेकरून अपार आयडी उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांच्या डिजीटल लॉकरवर त्यांची गुणपत्रिका उपलब्ध करून देता येईल. ११ एप्रिलपर्यंत परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ज्यांचा अपार आयडी उपलब्ध नाही त्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.