नंदुरबार - जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात आजही आदिवासींना जिवंतपणी रस्त्याअभावी, वैद्यकीय सुविधांअभावी मरणयातना भोगाव्या लागत असताना त्यांचे हे भोग मृत्यूनंतरही संपत नसल्याचे दिसत आहे. असेच एक उदाहरण नंदुरबार तालुक्यातील नंदपूर येथे घडले आहे. गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून अंत्यविधीसाठी नदीच्या दुसऱ्या काठावर जावे लागत आहे. नंदपूर गाव नदीच्या एका बाजूला तर स्मशानभूमी दुसऱ्या काठावर आहे, त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर नदीपात्रात दोरी टाकून पार्थिवासह नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. गावात रविवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची अंतिम यात्रा होडीतून रंका नदीतून स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. नातेवाईक आणि ग्रामस्थ यांना दोरीच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागला. नंदपूरच्या ग्रामस्थांसाठी आता हे नेहमीचे झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात त्यांना या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकास मंत्रिपद नंदुरबार जिल्ह्याकडे अनेक वर्षांपासून असतानाही जिल्ह्याचा विकास झालेला नसल्याचे दिसत आहे. हेही वाचा - Nashik Maruti Idol : नाशिकच्या पुराची पातळी दुतोंड्या मारुतीशी केव्हापासून जोडली गेली? काय आहे मूर्तीचा इतिहास? हेही वाचा - नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी नंदुरबार : नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून नदीच्या दुसऱ्या काठावर जावे लागत आहे. नंदपूर गाव नदीच्या एका बाजूला तर स्मशानभूमी दुसऱ्या काठावर आहे, त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर नदीपात्रात दोरी टाकून पार्थिवासह नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. pic.twitter.com/sV0fXR5HYf— LoksattaLive (@LoksattaLive) August 5, 2024 प्रगत आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी भागात आजही रस्त्यांअभावी, पूलअभावी अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. बांबूच्या झोळीतून रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत नेण्याची कसरत तर नंदुरबार जिल्ह्यातील नातेवाईकांना कायमच करावी लागत आहे. पुराच्या पाण्यातून वाट काढत गरोदर माता आणि इतर रुग्णांना बांबूच्या झोळीतून वाहून नेण्याच्या अलीकडेच तीन घटना जिल्ह्यात घडल्या.