लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : रेल्वे अपघात झाल्यावर नैतिकता म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक रेल्वे अपघात झाल्यानंतरही कोणी राजीनामा दिला का, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यावर बुद्धीला पटले नाही म्हणून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

रविवारी नाशिक दौऱ्यावर आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे सुरेश धस यांनी विशेष तपासणी पथकाकडे द्यावेत, असे सांगितले. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. यासंदर्भात आमच्या बैठका सुरू असून चर्चेतून मार्ग काढु. महायुतीत तीनही पक्षांच्या प्रमुखांमध्ये एकवाक्यता असून ती यापुढेही कायम राहील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. लाडक्या बहीण योजनेच्या निकषांनुसार पुढील हप्ते लाभार्थींना दिले जातील. नाशिक- पुणे रेल्वे हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून मार्गात काही बदल करण्याच्या सूचना आहेत. प्रकल्प नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांच्यादृष्टीने महत्वाचा असल्याचे पवार यांनी नमूद केले.