नाशिक: शहरातील लष्करी आस्थापना, चलन छपाई करणारे मुद्रणालय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अशी विविध १६ संवेदनशील ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने मानवरहित विमानांच्या उड्डाणास प्रतिबंधित क्षेत्र अर्थात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या परिसराच्या दोन किलोमीटरच्या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, गरम हवेचा फुगा, कमी वजनाची विमाने किंवा तत्सम हवाई साधनांचा पोलीस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय उड्डाण आणि वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जगभरात तसेच देशातील काही ठिकाणी मानवरहित विमानांचा वापर हल्ल्यासाठी होत आहे. जून २०२१ मध्ये स्फोटके भरलेली दोन ड्रोन जम्मू विमानतळावरील केंद्रावर धडकली. त्यामुळे इमारतीच्या छताचे काही नुकसान झाले. दुसरे ड्रोन मोकळय़ा जागेत पडले. तत्पुर्वी म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये भारत-पाक सीमेवर ड्रोनद्वारे शस्त्रे टाकण्यात आली होती. अलीकडेच अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असताना सीमा सुरक्षा दलाने ते जमीनदोस्त केले. ही एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रात भविष्यात ड्रोन तसेच तत्सम हवाई साधनांनी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, शहरातील संवेदनशील ठिकाणे ड्रोन उड्डाणास मनाई क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. शहरातील मर्मस्थळे, लष्करी आस्थापना, संवेदनशील ठिकाणे, प्रतिबंधित क्षेत्र या ठिकाणांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत. उपरोक्त आस्थापनांना आपल्या संरक्षक भिंतींवर ड्रोन उड्डाणास मनाई क्षेत्र (नो ड्रोन फ्लाय झोन) असे फलक ठळकपणे लावणे बंधनकारक आहे. ड्रोनद्वारे एखाद्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करावयाचे असल्यास कार्यक्रमाचे ठिकाण, माहिती, तारीख आणि वेळ, ड्रोनची माहिती, ड्रोन चालकाचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ड्रोन प्रशिक्षण घेतल्याच्या प्रमाणपत्राची प्रत अर्जासह सादर करणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द भारतीय विमान अधिनियम तसेच इतर कायद्यातील तरतुदीनुसार स्थानिक पोलीस ठाण्याकडून कारवाई केली जाणार आहे. हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रे कोणती ?
शहरातील देवळाली कॅम्पस्थित तोफखाना स्कूल, नाशिकरोड येथील भारत प्रतिभृती आणि चलार्थ पत्र मुद्रणालय, एकलहरा औष्णीक वीज केंद्र, उपनगर येथील शासकीय मुद्रणालय, बोरगड, म्हसरूळ आणि देवळाली कॅम्प येथील हवाई दलाचे केंद्र, गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल, जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृह व सीबीएसलगतचे किशोर सुधारालय, त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी व गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, गंगापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्र, पोलीस मुख्यालय व पोलीस आयुक्तालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिकरोड व देवळाली येथील रेल्वे स्थानक, मनपाची एमपीएजवळील, शिवाजीनगर, विल्होळी येथील जल शुध्दीकरण केंद्र या संवेदनशील ठिकाणांचा ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.
दोन किलोमीटरचे बंधन : संवेदनशील ठिकाणांच्या दोन किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, गरम हवेचा फुगा, हलक्या वजनाची विमाने आदी हवाई साधनांचा पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवागीशिवाय उड्डाण, वापर करण्यास मनाई राहणार आहे. वेगवेगळय़ा भागातील संवेदनशील ठिकाणे आणि दोन किलोमीटरच्या निकषाचा विचार करता सरासरी २० किलोमीटरच्या परिघात वसलेल्या शहरातील बहुतांश भागात ड्रोन उड्डाणास मनाई राहणार असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions drone flights city orders most parts nashik decision commissioner police security amy
First published on: 18-05-2022 at 00:06 IST