उद्घाटक निवडीवरून आयोजकांमध्ये दुफळी

पाटील यांच्या निवडीवरून साहित्य वर्तुळात नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी भ्रष्टाचारासारख्या गंभीर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या विश्वास पाटील यांच्या निवडीवरून आयोजकांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

स्वागत मंडळाची कुठलीही बैठक न होता, या नावावर निवडक पदाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, निमंत्रक संस्थेने मात्र रितसर चर्चा होऊन नाव निश्चिती झाल्याचा दावा केला आहे. या निवडीबद्दल साहित्य महामंडळ अंधारात होते. नाव निश्चित झाल्यानंतर त्यांना कळविले गेले. पूर्वकल्पना दिली असती तर संभाव्य धोके लक्षात आणून देता आले असते, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

या वादापासून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी अंतर राखले आहे. महामंडळाने आयोजकांना ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन वाघमारे आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ही नावे सुचविली होती. त्यातील एक म्हणजे चपळगावकर यांचे नाव समारोप सोहळय़ासाठी निश्चित झाले. उद्घाटक साहित्यिक असावा हा निकष होता. विश्वास पाटील यांचे नाव निश्चित करताना निमंत्रक संस्थेने महामंडळास कुठलीही कल्पना दिली नाही. नाव निश्चित करून महामंडळाला कळविण्यात आल्याचे पदाधिकारी सांगतात. पाटील यांच्या निवडीवरून साहित्य वर्तुळात नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. हा वाद आम्ही निर्माण केलेला नाही. त्यामुळे संयोजकांनी त्यावर तोडगा काढावा, अशी महामंडळाची अपेक्षा आहे. 

संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ साहित्यिकाचा शोध निमंत्रक संस्थेतील तीन, चार जण घेत होते. संमेलनाची नवीन तारीख आणि स्थळ जाहीर झाल्यापासून आजपर्यंत स्वागत मंडळाची एकही बैठक झालेली नाही, याकडे संमेलनात सक्रिय असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. स्वागत मंडळाची बैठक घेऊन सर्वाचे म्हणणे जाणून घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्यामुळे ही निवड वादात सापडल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.

वाद उद्भवल्यानंतर आता स्थानिक पदाधिकारी परस्परांकडे बोट दाखवत आहेत. संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांनी उद्घाटक निवड प्रक्रियेत आपला सहभाग नसल्याचे सांगितले. या वादाबाबत महामंडळाकडून अद्याप काहीही सांगण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी उद्घाटनासाठी साहित्यिकांची जी अनेक नावे चर्चेत होती, ती स्वागत मंडळाकडून आलेली होती. सर्वाशी चर्चा सुरू होती. त्यातून एक नाव निश्चित झाल्याचे नमूद केले.

संमेलनाचे उद्घाटक

साहित्यिक आहेत ना, मग विषय संपला. नाशिकच्या समितीने ते ठरविले. त्यानुसार नियोजन केले जात आहे.

छगन भुजबळ (स्वागताध्यक्ष, ९४ वे मराठी साहित्य संमेलन)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rift among the organizers of marathi sahitya sammelan over vishwas patil name zws