नाशिक – महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात एमडी ड्रग्जचा विषय प्रचारात आला असून अंमली पदार्थ विक्रेत्यांशी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तथा बंटी तिदमे यांचे संबंध असल्याचा आरोप कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला. प्रभाग २४ मध्ये युवक खुलेआम एमडी ड्रग्जचे सेवन करते. अमली पदार्थ विक्रेत्यांचे तिदमे यांच्याशी संबंध आहे.

तिदमे हे बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करतात, असे आरोप करताना महाजन यांनी जाहीर सभेत चित्रफीत, छायाचित्र सादर करीत शिवसेना शिंदे गटाला हादरा दिला. महाजन यांची सभा संपल्यानंतर चित्रफितीत दर्शविलेल्या एका मुलाच्या पालकाने महाजनांना जाब विचारल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान, बनावट, मॉर्फ चित्रफित तयार करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असून या विरोधात तक्रार देणार असल्याचे शिंदे गटाचे महानगरप्रमुख तिदमे यांनी म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी नाशिक शहरालगत एमडी ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. एमडी ड्रग्जशी राजकीय लागेबांधे असल्याचे आरोप लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून झाले होते. महापालिका निवडणुकीत प्रचार संपत असताना एमडी ड्रग्जवरून सत्ताधारी भाजपने मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला घेरल्याचे समोर आले. पवननगर मैदानावरील सभेत मंत्री महाजन यांनी मित्रपक्ष शिंदे गटाला लक्ष्य केले.

सिडकोत काही युवक खुलेआम एमडी ड्रग्जचे सेवन करीत असून ड्रग्ज विक्रेते शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांचे समर्थन असल्याचा आरोप त्यांनी केला. कुठेही मोकळा भूखंड दिसल्यास तिदमे हे माहितीच्या अधिकाराचा वापर करतात. बिल्डरांना ब्लॅकमेल करतात. अशा लोकांना महापालिकेत पाठविणार का, असा प्रश्न त्यांनी केला. या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना केली जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सभा आटोपून महाजन निघाले असताना चित्रफितीतील एका मुलांच्या पालकांनी धाव घेत महाजनांना अडवून जाब विचारल्याचे सांगितले जाते. बनावट छायाचित्र दाखवून बदनामी का करता, चित्रफितीची सत्यता पडताळली का, असे प्रश्न केल्यामुळे गोंधळ उडाला. महाजनांनी संबंधितांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. या घटनाक्रमाने नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र झाल्याचे समोर आले.

बनावट, मॉर्फ चित्रफिती तयार करून मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. या विरोधात आम्ही तक्रार देणार असून बदनामीचा खटलाही दाखल केला जाईल. प्रचार अतिशय खालच्या पातळीवर नेण्याचा प्रकार चुंभळे परिवाराकडून नेहमी केला जातो. आम्ही करोडपती म्हणून आमचाच नगरसेवक होण्याचा हक्क आहे अशी त्यांची भावना आहे. सिडकोतील सामान्य कामगार कुटुंबातील व्यक्तीने मोठे होऊच नये असे चुंबळे परिवाराचे म्हणणे आहे. सिडको म्हणजे यांची वतनदारी आहे का ? चोऱ्या करून कोण मोठे झाले हे सिडकोच नव्हे तर संपूर्ण नाशिकला माहिती आहे. गौळाण्याचे सरपंचपद भोगायचे आणि इथे महापालिका निवडणूक लढवायची ही शासनाची फसवणूक आहे – प्रवीण तिदमे (महानगरप्रमुख, शिवसेना शिंदे गट)