नाशिक : भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजेच ऋषिपंचमीसाठी गोदास्नान करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महिलांनी मंगळवारी पहाटेपासून गोदाकाठ गाठला. या दिवशी नदीत स्नानाला विशेष महत्त्व असताना प्रशासनाच्या वतीने स्नानासाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने नियोजन करणे अपेक्षित असतानाही गोदाकाठावर सर्व काही ‘रामभरोसे’ असल्याची स्थिती होती. बाहेरगावाहून आलेल्या महिलांसह अन्य भाविकांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली.

ऋषिपंचमी हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जाणारा महत्त्वाचा धार्मिक सण आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत केले जाते. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तऋषींसह अरुंधतीची विशेष पूजा केली जाते. अज्ञानाने किंवा कळत-नकळत झालेल्या चुका व दोषांचे, विशेषतः रज:स्वला काळातील स्पर्शदोषांचे निवारण करण्यासाठी हे व्रत महिलांसाठी महत्त्वाचे मानले जाते.

या अनुषंगाने मंगळवारी पहाटेपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर महिला गोदास्नानासाठी गोदाकाठावर दाखल झाल्या. रामकुंड परिसरात काम सुरू असल्याने नदीपात्रात पाणी नव्हते. बांधकामाचे पाणी त्या ठिकाणी साचले होते. महिलांनी श्रद्धापूर्वक या साचलेल्या पाण्यात स्नान केले. वास्तविक, या ठिकाणी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनीही केली होती. मात्र, सध्या गांधी तलाव आणि दुतोंड्या मारुती या ठिकाणी पाणी असल्याचे सांगण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने रामकुंड परिसरात महिलांना अस्वच्छ पाण्यात स्नान करावे लागले.

गोदाकाठ गाठणेही भाविकांसाठी सोपे नव्हते. कुंभमेळ्याच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. पाऊस नसतानाही खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. खड्डे, खोदकाम, बांधकाम साहित्य आणि बंद रस्ते अशा अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर अनेकांना गोदाकाठ गाठता आला.

या विषयी बोलताना धुळे येथील मंगला इसावे यांनी सांगितले, आजच्या दिवशी गोदास्नानाला महत्त्व आहे. पहाटे तीननंतर माझ्यासह अन्य तीन जणी नाशिकला आलो. येथे पोहोचताना अडचणी आल्या. गोदापात्रात अंघोळीसाठी पुरेसे पाणी नाही. जे पाणी मिळाले ते गटारीच्या पाण्यासारखे अस्वच्छ होते. प्रशासनाने पाणी सोडले असते तर परिस्थिती वेगळी असती. गोदापात्रात स्नान केल्याचे समाधान मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली.
या खोदकामामुळे माझ्यासोबत असलेली महिला खड्ड्यात पडणार होती. मात्र, वेळीच सावरल्याने तिला दुखापत झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

देवांग जानी यांनी सांगितले, गोदाकाठावर महिलांची दुतर्फा गर्दी आहे. पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. रामकुंडात पाणी नाही. लोकांना या ठिकाणी स्नानाचे महत्त्व आहे. प्रशासनाने पाणी सोडलेच नाही; पण गोदाकाठाकडे कसे जावे, याबाबत सूचना फलक किंवा सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजनांची तजवीज केली नसल्याचे दिसून आले.

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन

मागील आठवड्यात मुंबई येथील एक बालक पाण्यात वाहून गेला. या प्रकारातून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. स्नानासाठी होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी सूचना फलक लावणे अपेक्षित होते. तसेच नदीपात्रात पाणी सोडताना भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती करणे आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे होते. स्नानानंतर महिलांना वस्त्र बदलण्यासाठी तात्पुरती वस्त्रांतरगृहे देण्यात आली नाहीत. पूजा करण्यासाठी शेड उभारण्यात आलेले नाहीत. ठिकठिकाणी खोदकाम आणि बांधकाम साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आहे.