कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरूवारी दुपारी अपघातात महिला जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी गतिरोधकासाठी रास्ता रोको केला. या रस्त्यावर अनेक अपघात झालेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नांदुरी ग्रामपंचायतीने अनेकदा गतिरोधकसाठी पत्रव्यवहार केला असतानही दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा >>>धुळे: अवैधपणे गुंगीकारक औषधांचा साठा, तीन जणांविरुद्ध गुन्हा

नांदुरीमार्गे जाणाऱ्या महामार्गावर कायम अपघात होत असतात. अनेकांचे प्राणही गेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत गतिरोधकांची व्यवस्था करावी, अशी मागणी भाऊ कानडे यांनी केली आहे. आंदोलनप्रसंगी काही जणांनी तहसीलदार बी. ए. कापसे यांना माहिती दिली. त्यानंतर कळवण पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान नागरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास कळविल्यावर त्यांनी पाहणी करुन गतीरोधक तत्काळ टाकण्याचे आश्वासन दिले. नांदुरीतील महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे यांनी सांगितले,सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव असून या ठिकाणी धुळे – नाशिक रस्त्यावर सतत अपघात होत असतात.