नाशिक : पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच रस्त्यांची वाताहत झाली असून चिखल आणि खड्डेमय रस्त्यांमुळे या भागातील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे.

इगतपुरी तालुक्यात पंधरापेक्षा अधिक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. टाकेद परिसरात एकही रस्ता सुस्थितीत नाही. धामणगावजवळ समृद्धी महामार्गाच्या कामामुळे टाकेदकडे जाण्यासाठी वर्षांपासून पुलाचे काम संथपणे सुरू आहे. तात्पुरता तयार केलेला वळण रस्ता उन्हाळय़ात धुळीने आणि पावसाळय़ात चिखलाने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना वारंवार घडतात. रस्त्यावर पावलोपावली खड्डे असल्याने चालकांचा वाहन चालविताना जीव मेटाकुटीला येतो. नाशिक आणि सर्वतीर्थ टाकेद, भंडारदराकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे साकूरफाटा, निनावी, भरवीरमार्गे वासाळी हा आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील या रस्त्याची मे महिन्यात डागडुजी करण्यात आली होती. सध्या या रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. हा रस्ता पुणे, भंडारदरा, इगतपुरीकडे जातो. तिसरा रस्ता पिंपळगाव मोर अधरवडमार्गे टाकेद हा होय. रस्ता अतिशय खराब असल्याने या रस्त्याने कुणीच घोटीकडे जाण्यास तयार होत नाही. या रस्त्यासाठीही कोटय़वधी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे सांगितले जाते. परंतु, रस्त्याची दुरुस्ती काही होत नाही. त्यामुळे या रस्त्याऐवजी टाकेद परिसरातील ग्रामस्थ टाकेद खुर्द, तातळेवाडीमार्गे प्रवास करतात. हा रस्ताही अरुंद, घाटमाथ्याचा आहे. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. एकदरे, ठाणगाव, खिरवीरे, म्हैसवळण घाट मार्गे टाकेद हा रस्ता खड्डे बुजवूनही पुन्हा खड्डेमय झाला आहे.

या रस्त्यांविषयी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. टाकेदच्या कडवा नदीवरील दोन्ही पुलांच्या टोकाला खड्डे पडले आहेत. हे सर्वच रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी हरिदास लोहकरे, सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे आदींनी केली आहे.

चालू वर्षी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे या परिसरातून टाकेद तीर्थ, भंडारदरा, रंधा धबधबा, विश्रामगड, बितनगड, खेड, भैरवनाथ मंदिर, भावली धबधबा आदी पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी पर्यटक नाराज होतात. अनेकांचा हिरमोड होतो. अनेक जण खड्डय़ांमुळे प्रवास टाळतात. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.

– काशिनाथ कोरडे (सरपंच, वासाळी)

टाकेद ते धामणगाव, पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा आणि म्हैसवळण घाट-टाकेदमार्गे अधरवड या मुख्य तीनही रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. खड्डय़ांत पावसाचे पाणी साचल्याने चालकांना गाडी चालविताना खड्डय़ांचा अंदाज येत नाही.

– राम शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, टाकेद बुद्रुक)