नाशिक – अगदी हुबेहूब जिवंत भासणाऱ्या ‘एली’ हा ॲनिमॅट्रॉनिक हत्ती येथील इस्पॅलिअर स्कूलमध्ये सादर करण्यात आला. या हत्तीभोवती एक कथा गुंफण्यात आली असून ती कथाही यावेळी ऐकविण्यात आली. यासाठी निमित्त ठरले पेटा इंडिया, इस्पॅलिअर द हेरिटेज स्कूल आणि उपाध्याय फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे.

‘एली’ हा आशियातील पहिला रोबोटिक हत्ती असल्याचे सांगण्यात आले. पेटा इंडिया या संस्थेने मे २०२३ मध्ये प्राण्यांबद्दल संवेदनशीलता व सजगता निर्माण करणारा ॲनिमॅट्रॉनिक हत्ती तयार केला असून हा हत्ती आपली कहाणी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगतो. त्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा यांचा आवाज वापरण्यात आला आहे. यावेळी एलीने डोळे मिचकावणे, कान हलवणे अशा हालचाली करून शेकडो विद्यार्थ्यांना थक्क केले.

प्राण्यांबद्दल नव्या पिढीमध्ये संवेदनशीलता, दयाळूपणा आणि करुणा निर्माण करण्याच्या दृष्टीने एली हत्तीची ही गोष्ट अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल, असे मत यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी व्यक्त केले. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हत्ती जंगलातले प्राणी आहेत, कैदेत राहणारे नाहीत, हे समजल्याचे सांगितले.

प्राजक्ता जोशी, उपाध्याय फाउंडेशनच्या सहसंस्थापक बृंदा उपाध्याय, पेटा इंडियाच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. प्राजक्ता जोशी, मीनल शाह, अनुष्का यादव यांचीही उपस्थिती यावेळी होती. इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलच्या मुख्याध्यापिका अंकिता कुरिया यांनी नियोजन केले.

ॲनिमॅट्रॉनिक हत्ती ‘एली’ कसा आहे ?

सिलिकॉन व फायबर तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करत ॲनिमॅट्रॉनिक हत्ती ‘एली’ तयार करण्यात आला आहे. त्याचे वजन सुमारे ३७५ किलो, उंची ६.५ फूट, रुंदी ४.५ फूट आणि लांबी ८ फूट आहे. रोबोटिकच्या माध्यमातून डोळे, कान आणि सोंड यांची हालचाल करणारा हा हत्ती स्वतःची संवेदनशील कथाही सांगतो. पेटा इंडिया आणि इस्पॅलिअर स्कूल यांच्यावतीने नाशिकमधील १६ शाळांमध्ये ‘एली’ जाणार असून विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी संवेदनशील, दयाळूपणा व आदरभाव जपण्याचा संदेश देणार आहे.