मनमाड – नगर परिषद निवडणुकीतील एका उमेदवाराचे मतदानाच्या दिवशीच मंगळवारी सायंकाळी लग्न होते. हळद लावलेल्या नवरोबाची मुंडावळ्या बांधून वऱ्हाडी मंडळींसह मतदान केंद्रावर वाजतगाजत वरात आली. नवरदेव उमेदवारासह वऱ्हाडी मंडळीही प्रभागातील असल्याने सर्वांनी मतदान केल्यावर ते लग्नासाठी नाशिककडे मार्गस्थ झाले. अन्य एक नवरदेव उमेदवार हळद लावलेल्या अवस्थेत मतदान केंद्रावर आला. मतदान झाल्यानंतर बोहल्यावर चढला.

नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी तसेच १५ प्रभागातील एकूण ३१ नगरसेवकांच्या जागांसाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ होती. अंदाजे सरासरी ६० टक्क्यापर्यंत मतदान झाले. प्रभाग तीनमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रोहन सांगळे यांचे मतदानाच्या दिवशी सायंकाळी नाशिक येथे लग्न होते. तत्पुर्वी हळद लावलेल्या या उमेदवार नवरोबाची मुंडावळया बांधून वरात थेट वऱ्हाडी मंडळींसह मतदान केंद्रावर वाजत गाजत आली. नवरदेव रोहनने केंद्रात जाऊन मतदान केले. वऱ्हाडी मंडळीचे कुटुंबही त्याच प्रभागातील असल्याने नवरदेवाबरोबर सर्वांनी तेथे आधी मतदान केले.

सायंकाळी नाशिक येथे होणाऱ्या विवाहासाठी या वरातीचे दुपारी प्रस्थान झाले. दुसऱ्या एका लग्नासाठी दुपारी साडे बारा वाजता जाणाऱ्या मोहित महाजन या नवरदेव उमेदवाराने आधी हळद लावलेल्या अवस्थेत सकाळी दहाला गुरु गोबिंदसिंग शाळेतील केंद्रावर जाऊन मतदान केले. नंतर या विवाहासाठी तो कुटुंबियांसोबत रवाना झाला.

दरम्यान, मनमाडमध्ये सकाळी पहिले दोन तास थंडीमुळे सर्वत्र शुकशुकाट नंतर साडे अकरा पर्यंत १४ टक्के, त्यानंतर दुपारी दीडपर्यंत पर्यंत २४ टक्के, साडे तीनपर्यंत ३३ टक्के, साडे चारपर्यंत ५२ टक्के तर साडे पाच पर्यंत सरांसरी ५९ टक्के मतदान झाले. पण त्यानंतरही अनेक प्रभागात स्त्री पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मतदान रात्री आठपर्यंत चालेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. किरकोळ शाब्दिक वाद, चकमकी, वगळता मतदान सर्व १६ प्रभागातील ७२ केंद्रावर, तसेच त्यातील २६ संवेदनाक्षम केंद्रानवरही शांततेत पार पडले. नवमतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता.