जळगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून ९० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला लक्ष्य करत महिलांना योजनेतून वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून ‘X’ वर लिहिलेल्या पोस्टमध्ये “काय ओ भाऊराया, आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय? तुम्हाला लाडक्या बहिणी जड झाल्यात का? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको का झाल्या?” असा उपरोधिक सवाल करत रोहिणी खडसे यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्याचे आश्वासन देत ‘लाडकी बहीण’ योजना मोठा गाजावाजा करुन राबविण्यात आली. मात्र, सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
९२ लाख महिला योजनेतून बाहेर
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सुमारे ८० लाखांहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले होते. त्यानंतर आता आणखी १२ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ९२ लाख महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात आल्याचा दावा रोहिणी खडसेंनी केला आहे. सरकारमधीलच नेत्यांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेवरील खर्च २६ हजार १९७.७८ कोटी रुपयांवरून ३३ हजार ६९७ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच या योजनेवरील खर्चात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, हा खर्च कमी करण्यासाठी महिलांना लाभापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेत कपात करून सरकार स्वतःच्या आश्वासनांपासून मागे हटत असल्याची टीकाही रोहिणी खडसे यांनी केली.
काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 13, 2026
सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८… pic.twitter.com/FdJ2vmR2sa
लाडक्या बहिणींचा ‘दादा’ आता नाही
दरम्यान, आपल्या पोस्टच्या शेवटी रोहिणी खडसे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उद्देशूनही भावनिक साद घातली आहे. “लाडक्या बहिणींचा खंबीर ‘दादा’ आता नाही, पण किमान सुनेत्रा वहिनींनी तरी लाडक्या बहिणींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा. महिलांच्या प्रश्नांवर सरकारमध्ये ठाम भूमिका घ्यावी आणि लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
