जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीशी संबंधित समाज माध्यमावरील एका सूचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “मेरी मौत की चर्चा करने वालों, तुम्हारी साज़िशें मेरे हौसले को और बढ़ाती हैं…मैं आज भी जिंदा हूँ और कल भी रहूँगा, क्योंकि मेरी ज़िंदगी मेरे दुश्मनों की मोहताज नहीं,” असा आक्रमक आशय असलेली पोस्ट खडसे यांनी ‘X’ वर शेअर केली आहे.
रोहिणी खडसे यांच्या पोस्टमधील शब्दप्रयोग आणि त्यामागील संदर्भ लक्षात घेता, त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय विरोधकांवर निशाणा साधल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एक व्हिडिओ जोडला आहे. या व्हिडिओमध्ये पवार शांतपणे सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असलेले दिसतात. आणि त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सूचित होते. अलीकडच्या काळात पवार यांच्या आरोग्याबाबत काही अफवा आणि अपप्रचार करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांचा व्हिडिओ आणि पोस्ट महत्त्वाची मानली जात आहे. पवार यांची तब्येत उत्तम असल्याचा ठोस संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, पक्षांतील अंतर्गत तणाव आणि विरोधकांकडून होणारे आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांच्या पोस्टकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते ही पोस्ट केवळ अफवांना उत्तर देण्यासाठी नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दिलेला इशारा आहे. विशेषतः पवार यांच्या आरोग्याबाबत मुद्दाम चर्चा रंगवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यावर हा प्रतिउत्तरात्मक सूर असल्याचे मानले जात आहे.
मेरी मौत की चर्चा करने वालों,
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 23, 2026
तुम्हारी साज़िशें मेरे हौसले को और बढ़ाती हैं…
मैं आज भी जिंदा हूँ और कल भी रहूँगा,
क्योंकि मेरी ज़िंदगी मेरे दुश्मनों की मोहताज नहीं।"#SharadPawar #NCP #MaharashtraThisWeek pic.twitter.com/XUbRniWuu7
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोहिणी खडसे यांच्या पोस्टनंतर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया देत खडसे यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवले आहे. काहींनी ही पोस्ट पक्षाच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला दिलेले उत्तर म्हणून तिचे स्वागत केले आहे.
राजकीय वर्तुळात मात्र या पोस्टमागील नेमका उद्देश काय, यावर वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. काही जणांच्या मते हा थेट राजकीय विरोधकांना दिलेला टोला आहे, तर काहींच्या मते, ही पोस्ट पक्षातील अंतर्गत संदेशही असू शकतो. सध्या तरी रोहिणी खडसे यांनी या संदर्भात कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामागील नेमकी भूमिका आणि लक्ष्य कोण, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
