नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांमध्ये सात ते आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. धर्माच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार अमान्य असून, नाशिकचे अधिकारी यासंबंधीची माहिती दडपत असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला. कुंभमेळ्यासाठी इतका प्रचंड निधी नेमका कुठे खर्च झाला, हे शोधण्यासाठी खास मोहीम राबवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी संवाद यात्रेनिमित्त बुधवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आ. रोहित पवार यांनी रामकुंड परिसराला भेट दिली. गोदावरी नदीचे प्रदूषण तसेच औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रभावित झालेल्या दत्तनगर आदी ठिकाणांची पाहणी करून त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. धर्माच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा खडा टाकला आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे या सर्वांचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला.

मंत्री महाजन यांनी कधीकाळी जळगावमध्ये काम करणारे आणि आपले ऐकणारे सर्व अधिकारी नाशिकमध्ये आणले. नाशिक आणि महाराष्ट्रात अधिकारी नव्हते का, असा प्रश्न उपस्थित करीत बिल्डरांना फायदा व्हावा म्हणून नाशिक परिक्रमा मार्गाची (रिंग रोड) रचना बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दीड हजार कोटींची जमीन खरेदी करण्यात आली. पाच ते सात हजार कोटींची कामे महाजन यांच्या ओळखीच्या लोकांना, बगलबच्च्यांना आणि नातेवाइकांना देण्यात आल्याचा आरोप करीत, आगामी काळात हे सर्व उघड केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

कुंभमेळ्याच्या कामांची माहिती आपल्याला देऊ नये, असे मंत्री महाजन यांनी नाशिकच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यामागील त्यांचा मानस सांगता येणार नाही. इगतपुरीतील मानस हॉटेलमध्ये काही निवडक अधिकाऱ्यांच्या बैठका कशा होतात, हे सर्वांना ज्ञात आहे. पोलीस प्रशिक्षण आणि अन्य प्रशिक्षणांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही आ. पवार यांनी केला.

अधिकाऱ्यांना इशारा…

कुंभमेळ्याच्या कामांची माहिती १० दिवसांत न मिळाल्यास एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नाशिककरांना विश्वासात न घेता अधिकारी आणि नेते कामे रेटत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला गोदावरी नदीवरील घाट काढून टाकण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रस्त्यांच्या खोदकामामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींना महापालिकेत अद्याप नोकरी मिळालेली नाही. नाशिक रिंग रोडच्या कामासाठी वन आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. शहरातील सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प कार्यान्वित केला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.