धुळे : दुष्काळाची भीषणता नेमकी किती असते, याचे अंगावर शहारे आणणारे दृश्य बुधवारी (दि.३०) चिंचवार (ता. धुळे) येथील शिवारात पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना त्यांच्या डोळ्यादेखत एका हतबल शेतकऱ्याने स्वतःच्या हाताने आपल्या पपईच्या तब्बल तीन हजार उभ्या झाडांवर रोटाव्हेटर फिरवला. जवळपास वर्षभर जीवापाड जपलेली फळबाग काही क्षणांत मातीमोल होत असताना उपस्थित अनेकांच्या भावना दाटून आल्या. एका शेतकऱ्याच्या उद्ध्वस्त होत असलेल्या स्वप्नांचा हा क्षण दुष्काळाच्या विदारक वास्तवाची साक्ष देणारा ठरला.
चिंचवार येथील शेतकरी इसमोद्दीन पटेल यांनी मोठ्या आशा आणि भविष्यातील उत्पन्नाचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून पपईच्या तीन हजार झाडांची लागवड केली होती. या फळबागेसाठी सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले. ठिबक सिंचन, खत, औषधे, मशागत, मजुरी आणि सातत्याने केलेली निगा यासाठीही मोठी रक्कम खर्च झाली. मात्र यंदाच्या अपुऱ्या पावसाने सर्व गणितच कोलमडून टाकले. जवळपास ११ महिने उलटूनही झाडांना अपेक्षित फळधारणा झाली नाही. वाढत्या खर्चाचा डोंगर, उत्पन्नाचा पूर्ण अभाव आणि कर्जाच्या चिंतेमुळे अखेर उभी फळबाग नष्ट करण्याचा काळीज पिळवटून टाकणारा निर्णय त्यांना घ्यावा लागला. याच वेळी आमदार रोहित पवार हे परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गावशिवारात पोहोचले. रोटाव्हेटरने उभी झाडे नष्ट होत असल्याचे दृश्य पाहून त्यांनी तातडीने इसमोद्दीन पटेल यांच्याशी संवाद साधला. ‘अरे, उभ्या झाडांवर रोटाव्हेटर का मारतो आहे? तुझ्या फळबागेचा पंचनामा झाला का?’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर पटेल यांनी संपूर्ण परिस्थिती सांगत आर्थिक नुकसान आणि पावसाअभावी आलेली हतबलता व्यक्त केली. त्यानंतर आमदार पवार यांनी फळबागेची पाहणी करून नुकसानाची माहिती घेतली.
‘मोठ्या आशेने ही बाग उभी केली. लाखो रुपये खर्च झाले. पण पावसाने साथ दिली नाही. जवळपास वर्षभर मेहनत करूनही हातात काहीच आले नाही. आता आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली आहे. पुढे पुढे काय होते हेच पाहायचे आहे,’ अशी व्यथित प्रतिक्रिया इसमोद्दीन पटेल यांनी व्यक्त केली. या घटनेने केवळ एका शेतकऱ्याचे नुकसान झाले असे नाही, तर दुष्काळामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली असहाय्यता समोर आली आहे. अनेकांनी फळबागा, कापूस, मका, तूर आणि इतर पिकांवर मोठी गुंतवणूक केली; मात्र पावसाअभावी सर्व मेहनत वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती वाचविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अपुरे पडल्याने अनेकांना उभी पिके नांगरून टाकण्याची वेळ आली आहे.
चिंचवार येथील इसमोद्दीन पटेल यांच्या फळबागेचे हे विदारक दृश्य आता संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळाचे प्रतीक बनले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि जमिनीत गाडली जाणारी हजारो पपईची झाडे ही केवळ एका कुटुंबाची वेदना नसून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतीसमोरील गंभीर वास्तव अधोरेखित करणारी घटना ठरत आहे. आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती केवळ घोषणांची नव्हे, तर तातडीच्या आणि प्रत्यक्ष आर्थिक मदतीची.
