नंदुरबार – दुष्काळी भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. याशिवाय गेल्या वर्षीचा पीकविमा, वेळेवर कर्जमाफी, मजुरांना २५ हजारांची कौटुंबिक मदत आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफी या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्र्याना दिवाळी साजरी करु देणार नाही आणि रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा त्त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि रनाळे परिसरात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बांधावर जात शेतकऱयांची विचारपुस केली. शिवाय रस्त्यातील मेंढपाळ वस्तीला भेट देत त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. नंदुरबारमध्ये कापसाचे १०० टक्के नुकसान झाले असून अनेक ठिकाणी बोंडच आलेले नाही, तर ज्याठिकाणी बोंड दिसत आहे त्यांची वाढ खुटली असल्याचे देखील पवार म्हणाले.र मक्याची परिस्थितीही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने ही परिस्थिती पाहता सरसकट पंचनामे करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.
कर्जमाफीचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेला नसताना पंचनाम्याचे नाटक कशासाठी, असा सवाल पवार यांनी केला. पालकमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुळातच सरकार म्हणून देखील राज्यातील मंत्र्यांसोबतच प्रमुख नेत्याची देखील शेतकऱयांबाबत जबाबदारी आहे. मात्र या सरकारमधील प्रमुख नेते राजकारण करण्यात व्यस्त असल्याने त्यांना शेतकऱयांच्या आणि त्याच्या समस्यांचा विसर पडल्याचे देखील पवार म्हणाले. भाजपच्या गुजरातमधील दोन प्रमुख नेत्यासमोर राज्यातील सरकार झुकले, भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून या नेत्याना खुश करण्यासाठी नाशिकच्या खोऱ्यातील पाणी गुजरातला पळवले, मोठे प्रकल्प पळवले, त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी देखील वापर करण्याच त्यांना विसर पडला असल्याचे देखील पवार यावेळी म्हणाले.
हे सरकार मतांची हेरफार करुन निवडून आले आहे. ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या मदतीने बंगालमध्ये सत्ता आणली. मतदानाची चोरी झाल्याने सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे आमदार, खासदार विकत घेतले की जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज काय, असा या सरकारचा समज झालेला आहे.आम्ही विरोधात असलो तरी आम्ही जनसामान्याना विश्वासात घेवून लढणार असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले लोकसेवा आयोगाच्या परिक्षाच्या माध्यमातून सरकार अध्यक्षासह आरोपींना वाचविण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नंदुरबारनंतर धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही दुष्काळाची पाहणी करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले
