नंदुरबार : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी नंदुरबार येथील कौटिल्य अकॅडमीची पाहणी करत सरकारवर जोरदार टीका केली. एमपीएससीचे अध्यक्ष भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असल्याचा दावा करत, “मुख्यमंत्री मित्रत्व जपतात की विद्यार्थ्यांना न्याय देतात, हे आज पाहावे लागेल,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारला परवडणार नाही. मित्राचे पुनर्वसन करण्यासाठी खासदार-आमदारकीत कोट्यातून संधी देता येईल; मात्र येथे झालेल्या पुनर्वसनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. भिमनवार यांच्याशी मैत्री जपण्यापेक्षा महाराष्ट्र धर्म जपून एमपीएससी अध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगावे, अशी विनंती रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत असल्याचा आरोप करत, “महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली आहे,” असा दावा पवार यांनी केला. महिला व मुलींवरील अत्याचार वाढले असून बारामतीत गँगवार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सक्षम व्यक्तीला ही जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य असून सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. आंदोलन दडपले तर पुण्यात दिल्लीपेक्षाही मोठे आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला.

महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला गेल्याचे सांगितले. निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने स्वाभिमान असेल तर भाजपची साथ सोडावी, अशी भूमिका मांडत दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये, असेही पवार म्हणाले.