​नाशिक – लासलगाव बाजार समितीत अलीकडेच आंदोलन केल्यामुळे केंद्र सरकारने सरकारी कांद्याचा खरेदी दर प्रति किलोस साडेतीन रुपयांनी वाढवला. आता हाच दर २४ रुपये प्रति किलोपर्यंत नेला पाहिजे, यासाठी चांदवड येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे केले जात असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केले.

​कांद्याचे गडगडणारे दर, सरकारी दरातून उत्पादन खर्च भरून निघणार नसल्याकडे लक्ष वेधत आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे मंगळवारी सकाळी शेतकरी क्रांती महामोर्चा काढून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री अनिल देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह सीपीएम अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून सहभागी झाले. काही नेते बैलगाडीवर बसले होते. काही दिवसांपूर्वी कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत आम्ही आंदोलन केले होते. ते केवळ एक ‘ट्रेलर’ होतं आणि चांदवड येथील आंदोलन ‘मोठा ट्रेलर’ असणार आहे. आणि यानंतरही हे सरकार जागे झाले नाही तर मग काहीतरी वेगळे करावे लागेल, असे आमदार पवार यांनी सूचित केले.

या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील सरकारी कांदा खरेदीचा १२३५ रुपये दर १५८० रुपयांपर्यंत वाढवला. १८ तारखेला आंदोलनातून दबाव पडला म्हणून साडेतीन रुपये वाढले. पेट्रोल आठ रुपयांनी वाढले. सरकारने कांद्याचे प्रति किलोचे दर २४ रुपयांपर्यंत न्यावेत ही आमची आग्रही मागणी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.

​नाफेड हे दिल्ली अर्थात केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. चांदवडमधून मुंबई ते दिल्ली हा राष्ट्रीय महामार्ग जातो. राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड चौफुलीवर आंदोलनाव्दारे महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली. दिल्ली झोपलेली आहे, तसेच मुंबई झोपलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोबतीने आम्ही दिल्लीला जाणारा मार्ग रोखल्याने केंद्र सरकारला जाग येईल. मुंबईतील राज्य सरकारवर दबाव येऊन सरकार जागे होईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. उद्या रक्ताचे अश्रू यायला तिथे वेळ लागणार नाही. कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांकडे बघून या सरकारने जागे व्हावे ही आमची सर्वांची भूमिका असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकले.

सरकारी दरावर प्रश्नचिन्ह

​सरकारी खरेदीच्या वाढवलेल्या दरावर अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वीचा १२३५ रुपये असो की आताचा १५८० रुपये, या दराने कुठे कांदा खरेदी झाली ते दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. केंद्रातील नेतृत्व शेतकरी विरोधी असून हमीभाव मिळाल्याशिवाय आता कांदा उत्पादक स्वस्थ बसणार नसल्याचे दानवे यांनी नमूद केले.